पुणे (5 मार्च 2024 ): क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज (पुरुष) – आंतर जिल्हा युवा लीग 2024 या स्पर्धेची आज श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी, पुणे येथे सुरुवात झाली. क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान आयोजित युवा कबड्डी सिरीजचा विजेता संघ अहमदनगर जिल्हा विरुद्ध मुंबई शहर या दोन संघात झालेल्या सामन्यात अहमदनगर जिल्हा संघाने बाजी मारत दिमाखदार सुरुवात केली.
अहमदनगर संघाच्या प्रफुल झवारे ने पहिल्याच चढाईत गुण मिळवत संघाचा खात उघडला. प्रफुल झवारे सोबत आशिष यादव ने आक्रमक चढाया करत चौथ्या मिनिटालाच मुंबई शहर संघाला ऑल आऊट करत सामन्यात 10-02 अशी आघाडी मिळवली. मुंबई शहर कडून तुषार शिंदे एकाकी झुंज देत होता. अहमदनगर कडून सौरव मेद व संकेत खलाटे ने बचवाफळीत उत्कृष्ट खेळ करत गुण मिळवत मध्यंतराला अहमदनगर संघाला 19-10 अशी आघाडी मिळवून दिली होती.
अहमदनगर संघाने मध्यंतरा नंतरही आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत सामन्यावर पकड मिळवली. के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मधील पहिला हायफाय अहमदनगरच्या सौरव मेद ने केला तर मुंबई शहरच्या तुषार शिंदे ने पहिला सुपर टेन पूर्ण केला. पण त्यापाठोपाठ अहमदनगरच्या संकेत खलाटे ने हायफाय तर आशिष यादव ने सुपर टेन पूर्ण करत अहमदनगर संघाचा पहिला विजय निश्चित केला.
अहमदनगर संघाने मुंबई शहर संघावर 41-25 अशी मात देत के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मधील पहिला विजय मिळवला. अहमदनगर संघाकडून आशिष यादव ने चढाईत 10 गुण मिळवले तर अनुभवी प्रफुल झवारे ने चढाईत 9 गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली. संकेत खलाटे व सौरव मेद यांनी हायफाय पूर्ण करत संघाची बचवाफळी सांभाळली. तर मुंबई शहर कडून तुषार शिंदेने एकाकी झुंज दिली.
काल 4 मार्च 2024 रोजी या स्पर्धेचा महिलांच्या प्रेक्षणीय सामन्याने उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. डॉ. पतंगराव कदम महिला कबड्डी संघ विरुद्ध प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन या महिला संघाच्या मध्ये झालेल्या या लढतीत प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने 47-12 असा एकतर्फी विजय मिळवला.
- बेस्ट रेडर- तुषार शिंदे , मुंबई शहर
- बेस्ट डिफेंडर- संकेत खलाटे , अहमदनगर
- कबड्डी का कमाल- सौरव मेद , अहमदनगर