के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज – आंतर जिल्हा कबड्डी लीगच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध पालघर काझीरंगा रहिनोस यासामन्याने झाली. दोन्ही संघाच्या कडून संथ सुरुवात पाहायला मिळाली. चौथ्या मिनिटाला मुंबई उपनगर संघाकडे 4-1 अशी आघाडी असताना पालघरच्या राहुल सवरने सुपर रेड करत 4-4 अशी बरोबरी साधली.
आकाश रुडेलेच्या अष्टपैलू खेळाने मुंबई उपनगर संघाला मध्यंतरापर्यत 21-16 अशी आघाडी मिळवायला यश आले. तर पालघर संघाचा कर्णधार राहुल सवर आज सुद्धा एकाकी झुंज देत होता. मध्यंतराला बदली होऊन आलेल्या प्रतीक जाधवने सलग चढाया करत मुंबई उपनगर संघाला ऑल आऊट करत सामना 21-21 असा बरोबरीत आणला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांत कधी पालघर कडे आघाडी तर कधी मुंबई उपनगर आघाडी येत होती. शेवटची दोन मिनिटं शिल्लक असताना पालघर कडे 33-32 अशी नाममात्र आघाडी होती. आकाश तावडे ने सलग दोन यशस्वी चढाया करत मुंबई उपनगर संघाला आघाडी मिळवून दिली. शेवटच्या मिनिटाला पालघर संघाला ऑल आऊट करत मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघाने 39-34 असा सलग दुसरा विजय साकारला.
मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स कडून आकाश रुडेले अष्टपैलू खेळ करत 10 गुण कमावले तर अलंकार पाटीलने 5 पकडी करत आपला दुसरा हायफाय पूर्ण करत विजयात मोलाची भूमिका बजावली. पालघर काझीरंगा रहिनोस संघाच्या राहुल सवर व विराज ठाकरेची खेळी व्यर्थ ठरली.
- बेस्ट रेडर- राहुल सवर, पालघर काझीरंगा रहिनोस
- बेस्ट डिफेंडर- विराज ठाकरे, पालघर काझीरंगा रहिनोस
- कबड्डी का कमाल – आकाश रुडेले, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स