पुणे: क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज 2024 या स्पर्धेला आजपासून श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे – बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात गतविजेत्या अहमदनगर जिल्हाने मुंबई शहर संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली. तर नांदेड, धुळे व बीड या संघांनी सुद्धा पहिल्या दिवशी विजय मिळवत स्पर्धेचा प्रारंभ केला.
पहिला सामना अहमदनगर विरुद्ध मुंबई शहर व तिसरा सामना धुळे विरुद्ध जालना हे सामने एकतर्फी झाले. तर नांदेड विरुद्ध रत्नागिरी, रायगड विरुद्ध बीड यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळाली. नांदेड विरुद्ध रत्नागिरी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत याकूम पठाणच्या अष्टपैलू खेळीने नांदेड संघाने 30-28 असा विजय मिळवला. तर राहुल टेकेच्या आक्रमक 18 गुणांच्या खेळीच्या जोरावर बीड संघाने रायगड संघावर मात दिली. पहिल्या सामन्यात गतविजेत्या अहमदनगर संघाने मुंबई शहर संघावर 41-25 असा विजय मिळवत स्पर्धेतील आपले इरादे स्पष्ट केले. धुळे संघाने 37-19 असा जालना संघाचा पराभव केला.
पहिल्याच दिवशी 8 चढाईपटूंनी सुपर टेन पूर्ण करत जोरदार सुरुवात केली त्यात सर्वाधिक 18 गुण राहुल टेके ने मिळवले. तर 4 बचावपटूंनी हाय फाय पूर्ण केले. अहमदनगरच्या संकेत खलाटे ने पकडीत सर्वाधिक 6 गुण मिळवले. पहिल्या दिवसाचा खेळ संमिश्र राहिला.
आजचे संक्षिप्त निकाल
अहमदनगर जिल्हा 41 – मुंबई शहर 25
रत्नागिरी जिल्हा 28 – नांदेड जिल्हा 30
धुळे जिल्हा 37 – जालना जिल्हा 19
रायगड जिल्हा 38 – बीड जिल्हा 41