जोस बटलरने श्रीलंकेविरुद्ध झळकावलं दमदार शतक!

WhatsApp Group

शारजाह – इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलरने आयसीसी T20 विश्वचषक 2021 मधील पहिलं-वहिलं शतक आपल्या नावावर केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरने 67 चेंडूत धमाकेदार 101 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावत 163 धावा केल्या होत्या.

शारजाहच्या संथ खेळपट्टीवर बटलरने पहिल्या 45 चेंडूत आपलं अर्धशतक केलं पण पुढच्या 22 चेंडूत त्याने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला. बटलरच्या या वादळी खेळीत 6 चौकार आणि 6 खणखणीत षटकारांचा समावेश होता. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेवर 26 धावांनी विजय मिळवला असून या सामन्यात त्याला सामानावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

जोस बटलरने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 2 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी इयॉन मॉर्गन टी20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा आकडा गाठला होता. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा बटलर हा इंग्लंडचा पहिला खेळाडू बनला आहे.


जोस बटलर हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 2 हजारपेक्षा अधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला क्रिकेटर बनला आहे. बटलरच्या टी20 कारकिर्दीची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. बटलरने त्याच्या पहिल्या 10 टी20 सामन्यांमध्ये फक्त 7.20 च्या सरासरीने धावा केल्या होत्या आणि त्याचा स्ट्राइक रेटही फक्त 80 होता.

श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात बटलरनेही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 1 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने ही कामगिरी अवघ्या 26 डावात केली आहे. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.