अॅशेस मालिका: जॉनी बेयरस्टोच्या शतकाने इंग्लंडचा डाव सावरला!
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या अॅशेस कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ८ विकेट्स गमावत ४१६ धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानंतर फलंदाजीस आलेल्या इंग्लंड संघाच्या पहिल्या चार फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला २० धावांच्यावर धावा करता आल्या नाहीत. पुन्हा एकदा इंग्लंड पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र तयार होत होते. मात्र पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो संयमी फलंदाजी करत इंग्लंडला चांगली धावसंख्या उभी करण्यास मदत केली.
जॉनी बेयरस्टोने ठोकले शानदार शतक
या मालिकेत अपयशी ठरलेला बेन स्टोक्स या सामन्यात त ९१ चेंडूमध्ये ६६ धावा करून बाद झाला. तर जॉनी बेयरस्टोने धमाकेदार शतक साजरे केले. सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेयरस्टो १४० चेंडूमध्ये १०३ धावा करत नाबाद आहे. बेयरस्टोसोबत जॅक लीच ४ धावांवर नाबाद आहे. जॉनी बेयरस्टोचे शतक हे या मालिकेतील इंग्लंड संघाकडून केलेलं पहिलंच शतक ठरलं आहे. गेल्या ३ कसोटी सामन्यात एकाही इंग्लंड संघातील खेळाडूला शतक करता आले नव्हते.
स्टोक्स आणि बेयरस्टोच्या शानदार फलंदाजीमुळे चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने सात गडी गमावत २५८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने आणि स्कॉट बोलंडने प्रत्येकी २ विकेट्स तर मिचेल स्टार्क, कॅमरून ग्रीन आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवला.
कर्णधार जो रूट आणि जोस बटलर शून्यावर बाद
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंड कर्णधार जो रूट खातं न खोलताच तंबूत माघारी परतला. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडने रूटला शून्यावर माघारी धाडले. त्यासोबतच इंग्लंडचा दुसरा दिग्गज फलंदाज जोस बटलरही या डावात शून्यावर बाद झाल्याने इंग्लंडचा संघ अडचणीत आला होता.
या मालिकेतील पहिल्या तीन्ही सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव झाल्याने जो रूटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच तो शून्यावर बाद झाला आहे. तसेच या मालिकेत जोस बटलरलाही आपल्या नावाला साजेल अशी कामगिरी करता आली नाहीय.
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पुन्हा चमकले
पहिल्या तीन सामन्यांप्रमाणेच या ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करत आपला पहिला डाव ४१६ धावांवर घोषित केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन करणाऱ्या उस्मान ख्वाजाने दमदार शतक ठोकले. त्याने २६० चेंडूमध्ये १३७ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चारशेपार नेली. त्यासोबतच माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही १४१ चेंडूमध्ये ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली.