England vs India : उस्मान ख्वाजा, जो रूट यांना मागे टाकत जॉनी बेअरस्टो ठरला 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

England vs India : इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने दोन तुफानी खेळी खेळून इंग्लंडला विजयापर्यंत नेले. त्यात आता भारताविरुद्ध एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात बेअरस्टोने आपला दमदार फॉर्म कायम ठेवला आणि कठीण प्रसंगी शानदार फलंदाजी करताना शतक झळकावून मोठी कामगिरी केली.
जॉनी बेअरस्टो 2022 साली कसोटीत सर्वाधिक धावा (Jonny Bairstow most Test Run 2022) करणारा फलंदाज बनला आहे. या यादीत त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आणि इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) यांना मागे टाकले आहे. बेअरस्टोने आतापर्यंत 8 सामन्यांच्या 15 डावात 71.83 च्या सरासरीने 862 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. बेअरस्टोची यंदाची सर्वोत्तम धावसंख्या 162 आहे.
त्याचबरोबर ख्वाजाने 6 सामन्यांच्या 11 डावात 117.42 च्या सरासरीने 822 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 शतके आणि 3 अर्धशतकेही केली आहेत. ख्वाजाची सर्वोत्तम धावसंख्या 160 आहे. इंग्लिश फलंदाज रूटबद्दल बोलायचे झाले तर त्याने 9 सामन्यांच्या 17 डावात 52.33 च्या सरासरीने 785 धावा केल्या आहेत. रूटने यावर्षी चार शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. रूटची सर्वोत्तम धावसंख्या 176 आहे.