जबलपूर (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका २७ वर्षीय तरुण डॉक्टरची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. जबलपूर-भोपाळ हायवेवर असलेल्या सहजपूर पुलाखाली सहा अज्ञात हल्लेखोरांनी डॉक्टरवर चाकूने सपासप वार केले. ही हत्या इतकी क्रूर होती की, डॉक्टरच्या शरीरावर आणि गळ्यावर ११ हून अधिक खोल जखमा आढळल्या आहेत. जोपर्यंत डॉक्टरचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत हल्लेखोर त्यांच्यावर वार करत राहिले. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गाडी खराब होणे जिवावर बेतले
मृत डॉक्टरची ओळख महेंद्र साहू (वय २७) अशी पटली असून, ते पाटन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुवारा गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र शुक्रवारी संध्याकाळी आपल्या स्कॉर्पिओ गाडीने उज्जैनला जाण्यासाठी निघाले होते. सहजपूर गावातील एका व्यक्तीने त्यांची गाडी भाड्याने बुक केली होती. ड्रायव्हर उपलब्ध नसल्यामुळे महेंद्र स्वतः गाडी घेऊन निघाले. मात्र, वाटेतच त्यांची गाडी खराब झाली. रात्री मेकॅनिक न मिळाल्याने ते तिथेच थांबले. शनिवारी सकाळी मेकॅनिक आला, पण काही सामान आणण्यासाठी तो पुन्हा शहरात गेला. महेंद्र तिथे एकटेच असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली कैद
भरदुपारी १ च्या सुमारास महेंद्र यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन मोटारसायकलवर सहा तरुण तोंडाला रुमाल बांधून वेगाने जाताना दिसले आहेत. हेच लोक या हत्येत सामील असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी दारूच्या बाटल्याही सापडल्या असून, काही वेळापूर्वी महेंद्र यांचे कुणाशी तरी कडाक्याचे भांडण झाले असावे, असा अंदाज फॉरेन्सिक टीमने व्यक्त केला आहे.
तीन विशेष पथकांकडून तपास सुरू
एफएसएल अधिकारी नीता जैन यांनी सांगितले की, शरीरावरील जखमांच्या खुणांवरून ही हत्या अतिशय नियोजनबद्ध आणि क्रूरतेने केली गेली आहे. महेंद्र यांच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा एक परोपकारी डॉक्टर होता आणि त्याचे कोणाशीही वैर नव्हते. भेडाघाट पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेसाठी तीन विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमुळे डॉक्टर समुदायामध्ये सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
