
मुंबई – केरळमध्ये मान्सून वेळेपूर्वीच तीन दिवस अगोदर रविवारी दाखल झाला आहे. त्याच्या पुढील प्रवासाला हवामान अनुकूल असतानाच पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही भागामध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
मुंबईचे कमाल तापमान रविवारी ३४.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबईच्या कमाल तापमानामध्ये फार काही चढ- उतार नसले तरीदेखील आर्द्रता कमी अधिक होत असल्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा जाच कायम आहे.