Shoaib Akhtarचा मोठा दावा, म्हणाला..’T20 WCमध्ये भारताला पराभूत करणे पाकिस्तानसाठी कठीण’

WhatsApp Group

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) मोठा दावा केला आहे. गेल्या T20 विश्वचषकाप्रमाणे या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकात भारताला हरवणे आपल्या देशाच्या संघाला कठीण जाईल असं त्याने म्हटलं आहे. T20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान आणि भारत त्यांच्या संबंधित पहिल्या-वहिल्या साखळी सामन्यांमध्ये एकमेकांशी भिडतील. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या संघाने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानचा हा पहिलाच विजय ठरला.

दोन्ही संघ पुन्हा एकाच गटात आहेत आणि 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर आमनेसामने येतील. क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “यावेळी भारत योग्य नियोजन करून मैदानात उतरेल. यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करणे पाकिस्तानसाठी सोपे नसेल.” टीम इंडिया आपल्या मागील पराभवातून धडा घेईल आणि नव्या सामन्यासाठी सज्ज असेल असं अख्तरने म्हटलं आहे.

पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचा सल्लाही त्याने दिला, कारण मेलबर्नची खेळपट्टी त्यांच्या वेगवान गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल असेल. आता सामन्याच्या निकालाचा अंदाज बांधणे फार कठीण आहे, पण मेलबर्नची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना बाउन्स देत असल्याने पाकिस्तानने दुसऱ्या डावात गोलंदाजी करावी, असे तो म्हणाला. यावेळी प्रेक्षकांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे, ज्यामध्ये भारतीय प्रेक्षक जास्त असतील, असेही त्याने म्हटले आहे.

तो म्हणाला, “मला विश्वास आहे की यावर्षी प्रेक्षक खूप जास्त असतील. मेलबर्नमधील सामना पाहण्यासाठी दीड लाख तरी चाहते असतील. यापैकी 70 हजार भारतीय प्रेक्षक असतील.” भारतीय संघ चांगल्या लयीत दिसत आहे, तर पाकिस्तान संघही सामने जिंकत आहे. यावेळी भारतीय संघाची अडचण माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म आहे, तर पाकिस्तानचे अनेक खेळाडू दमदार लयीत दिसत आहेत.