अजित पवार गटाकडून कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी दिल्याची चर्चा

WhatsApp Group

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून एक मोठी आणि वादग्रस्त राजकीय घडामोड समोर आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना ही घोषणा झाल्याने पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक यंदा तिरंगी होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाऊ निवासस्थानी एबी फॉर्म वाटपासाठी मोठी गर्दी झाली होती. याचवेळी जयश्री मारणे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक 10 बावधन येथून एबी फॉर्म देण्यात आला आहे. जयश्री मारणे या माजी नगरसेविका असून, त्यांनी याआधीही पुणे महापालिकेची निवडणूक लढवली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधकांकडून तीव्र टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, गुन्हेगारी संपवण्याचे वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांनीच गजा मारणे यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने हा निर्णय अधिक वादग्रस्त ठरत आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी जयश्री मारणे यांनी बारामती येथील हॉस्टेलमध्ये अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली होती, जी आता खरी ठरली आहे.

जयश्री मारणे यांनी 2012 साली कोथरूड मतदारसंघातून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्या मनसेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. पुढे 2022 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या अजित पवार गटाच्या संपर्कात होत्या आणि आता त्या अधिकृतपणे उमेदवार ठरल्या आहेत.

दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारी विश्वाशी संबंधित व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबीय राजकारणात सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. याआधीही काही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. अशातच जयश्री मारणे यांच्या उमेदवारीमुळे पुणे महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय तापमान चांगलेच वाढण्याची शक्यता आहे.