ICC वनडे क्रमवारीत आयर्लंडच्या खेळाडूने विराट कोहलीला टाकले मागे

0
WhatsApp Group

आयसीसीने जारी केलेल्या नव्या वनडे क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. क्रमवारीतील विशेष बाब म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर या वेळी एका नव्या खेळाडूचाही टॉप 10 मध्ये प्रवेश झाला आहे. मात्र, पहिल्या क्रमांकासह पहिल्या पाच स्थानावंर कोणताही मोठे बदल झालेला नाही. मोठी गोष्ट म्हणजे आयसीसीच्या टी20 क्रमवारीत भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव अजूनही चांगल्या आघाडीसह पहिल्या क्रमांकावर आहे.

ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीबद्दल बोलायचे तर, बाबर आझम अजूनही येथे पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर आहे. त्याचे रेटिंग आता 886 वर गेले आहे. रॅसी व्हॅन डर डुसेन 777 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याही क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. त्यापाठोपाठ फखर जमान 755 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आणि इमाम-उल-हक 745 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. टॉप 4 मध्ये तीन खेळाडू फक्त पाकिस्तानचेच आहेत. भारताचा शुभमन गिल 738 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, आयर्लंडच क्रिकेट संघाचा खेळाडू हॅरी टॅक्टर Harry Tector ‘टॉप 10’मध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला आहे. तो 722 रेटिंगसह थेट सातव्या क्रमांकावर गेला आहे. याचा फटका विराट कोहलीला बसला आहे. कोहली आता 719 च्या रेटिंगसह आठव्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचवेळी क्विंटन डिकॉकलाही एका स्थानाचा फटका बसला असून तो नवव्या क्रमांकावर आला आहे. ‘टॉप 10’मध्ये रोहित शर्माचे स्थान अबाधित आहे, 707 च्या रेटिंगसह रोहित दहाव्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत जोश हेझलवूड अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 705 आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 691 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मिचेल स्टार्क 686 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. मॅट हेन्री 667 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे आणि ट्रेंट बोल्ट 660 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे.
मोहम्मद सिराजशिवाय टीम इंडियाचा कोणताही खेळाडू टॉप 10 गोलंदाजांच्या यादीत नाही. एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर येथे शाकिब अल हसनचा ताबा आहे. तो 367 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. मोहम्मद नबी 310 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिद खानचे रेटिंग 280 असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिकंदर रझा चार आणि झीशान मकसूद पाचव्या स्थानी आहे. या यादीत ‘टॉप 5’ मध्ये टीम इंडियाचा एकही खेळाडू नाही.