जागतिक राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळाची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेनंतर इराणनेही आता आरपारची लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेपूर्वी इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबफ यांनी स्पष्ट केले आहे की, “बंदुकीच्या टोकावर चर्चा करणे शक्य नाही.” अमेरिकेने इराणवर लादलेली आर्थिक आणि नौदल नाकाबंदी जोपर्यंत मागे घेतली जात नाही, तोपर्यंत इराण कोणत्याही दबावाखाली वाकणार नाही, अशी ठाम भूमिका तेहरानने घेतली आहे.
ट्रम्प यांचा ‘अंतिम इशारा’ आणि लष्करी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या व्यासपीठावरून इराणला सज्जड दम भरला आहे. ट्रम्प यांच्या मते, इस्लामाबादमधील ही चर्चा इराणसाठी आपली प्रतिमा सुधारण्याची आणि शांतता प्रस्थापित करण्याची शेवटची संधी आहे. जर इराणने अमेरिकेने प्रस्तावित केलेला करार मान्य केला नाही, तर इराणमधील प्रत्येक पॉवर प्लांट आणि महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या विधानामुळे चर्चेपूर्वीच दोन्ही देशांमधील कटुता कमालीची वाढली आहे.
प्रतिनिधी मंडळात मोठे बदल: कुशनर आणि विटकॉफ मैदानात या महत्त्वाच्या चर्चेसाठी अमेरिकेकडून मोठी रणनीती आखली गेली आहे. ताज्या माहितीनुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस या चर्चेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्याऐवजी ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांचे जावई जेरेड कुशनर सोमवारी संध्याकाळपर्यंत इस्लामाबादमध्ये पोहोचणार आहेत. हे दोन्ही दिग्गज मंगळवारी इराणी अधिकार्यांशी संवाद साधतील. यापूर्वी झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने अमेरिकेने आता आपल्या सर्वात अनुभवी टीमला मैदानात उतरवले आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी आणि नाकाबंदीचा पेच लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील १० दिवसांच्या युद्धविरामानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली करण्याचे संकेत दिले होते. मात्र, ट्रम्प यांनी इराणी बंदरांवर अमेरिकन नौदलाची नाकाबंदी सुरूच राहील असे जाहीर करताच, इराणने आपले निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. जोपर्यंत अमेरिका आपली आर्थिक वेढा उठवत नाही, तोपर्यंत तिथून एकाही जहाजाला सुरक्षित जाऊ दिले जाणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.
मुत्सद्देगिरी की युद्ध? मोहम्मद बाघेर गालिबफ यांच्या मते, इराणला शांतता हवी आहे, परंतु अमेरिकेच्या बदलत्या धोरणांमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. “आम्ही मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर मागे हटणार नाही, पण जर आमचे मार्ग अडवले जात असतील, तर आम्ही इतरांनाही तिथून जाऊ देणार नाही,” असे गालिबफ यांनी निक्षून सांगितले आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष मंगळवारी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या या चर्चेवर लागले आहे, ज्यावर पश्चिम आशियाचे भविष्य अवलंबून आहे.
