आयपीएलला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’! मुकुल चौधरीचा मैदानावर राडा; रोज 100-150 षटकार मारण्याचा केला खुलासा
आयपीएल २०२६ मध्ये दररोज नवनवीन हिरे चमकताना दिसत आहेत, पण लखनऊ सुपर जायंट्सच्या (LSG) मुकुल चौधरीने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) जे केले, ते पाहून क्रिकेट जगताचे डोळे विस्फारले आहेत. अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर लखनऊला विजय मिळवून देणाऱ्या मुकुलने आपल्या यशाचे गुपित उघड केले आहे. “मैदानात षटकार मारणे ही माझ्यासाठी सवय झाली आहे, कारण मी रोज सरावात १०० ते १५० षटकार खेचतो,” असा खळबळजनक खुलासा मुकुलने सामन्यानंतर केला.
केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई
मुकुल चौधरी जेव्हा मैदानात आला, तेव्हा सामना लखनऊच्या हातातून निसटताना दिसत होता. मात्र, त्याने केवळ २७ चेंडूत ५४ धावांची स्फोटक खेळी करत सामन्याचे चित्र पालटले. शेवटच्या षटकात लखनऊला विजयाची गरज असताना मुकुलने एक षटकार आणि एक चौकार मारून केकेआरच्या तोंडचा घास हिरावून घेतला. त्याच्या या खेळीत त्याने मारलेले ‘हेलिकॉप्टर शॉट्स’ पाहून चाहत्यांना एमएस धोनीची आठवण झाली.
धोनी माझा आयडॉल!
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुकुलने आपल्या फलंदाजीच्या शैलीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “मी लहानपणापासून एमएस धोनीला पाहत मोठा झालो आहे. तोच माझा आदर्श (Idol) आहे. त्याचे फिनिशिंग कौशल्य पाहूनच मी शेवटच्या षटकांपर्यंत खेळायला शिकलो.” मुकुलच्या या ‘मॅच विनिंग’ कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली असून, त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटले जात आहे.
लखनऊचा दुसरा विजय
मुकुलच्या या अर्धशतकी खेळीमुळे लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२६ मधील आपला दुसरा विजय नोंदवला आहे. संघ सध्या जोमात असून मुकुलसारख्या युवा खेळाडूच्या फॉर्ममुळे संघाचे मनोबल उंचावले आहे. येणाऱ्या सामन्यांमध्येही मुकुलची ही ‘सिक्सर मशीन’ अशीच धडाडत राहील, अशी आशा लखनऊच्या चाहत्यांना आहे.
