SRH vs RR: प्रफुल्ल हिंगेचे ‘वादळ’ आणि ईशानची ‘आतिषबाजी’! हैदराबादचा राजस्थानवर 57 धावांनी मोठा विजय

WhatsApp Group

SRH vs RR: आयपीएल २०२६ मधील २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने उभारलेला २१६ धावांचा डोंगर पार करताना राजस्थानच्या फलंदाजांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडाली. प्रफुल्ल हिंगेच्या घातक गोलंदाजीसमोर राजस्थानच्या आघाडीच्या फळीने पहिल्याच ओव्हरमध्ये गुडघे टेकले, ज्यामुळे हैदराबादला ५७ धावांनी दिमाखदार विजय मिळवता आला.

ईशान किशनची तुफानी खेळी; हैदराबादचे विशाल आव्हान

हैदराबादची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर अभिषेक शर्मा ‘गोल्डन डक’वर बाद झाला, तर ट्रॅव्हिस हेडने १८ चेंडूत १८ धावांची संथ खेळी केली. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ईशान किशनने मैदानाचा ताबा घेतला. त्याने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या ४४ चेंडूत ९१ धावांची स्फोटक खेळी केली. यात ८ चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याला हेनरिक क्लासेन (४० धावा), नितीश कुमार रेड्डी (२८ धावा) आणि सलिल अरोरा (नाबाद २४ धावा) यांनी मोलाची साथ दिल्याने हैदराबादने २० षटकांत २१६ धावांपर्यंत मजल मारली.

प्रफुल्ल हिंगेचा पहिल्याच ओव्हरमध्ये धमाका

२१७ धावांच्या विशाल लक्षाचा पीछा करताना राजस्थान रॉयल्सला प्रफुल्ल हिंगेने धक्क्यावर धक्का दिला. सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने चमत्कारिक गोलंदाजी करत ३ मोठे बळी घेतले. राजस्थानचे वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लहुआन-ड्रे प्रेटोरियस हे तिघेही खाते न उघडताच माघारी परतले. प्रफुल्लच्या या धक्क्यातून राजस्थानचा संघ सावरूच शकला नाही. पदार्पण करणाऱ्या साकिब हुसैनने दुसऱ्याच ओव्हरमध्ये यशस्वी जैस्वालला (१ धाव) बाद करून राजस्थानचे कंबरडे मोडले.

जडेजा-फेरेराची झुंज अपयशी; हैदराबादचे गोलंदाज चमकले

वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार रियान परागही केवळ ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा (४५ धावा) आणि डोनोवन फेरेरा (६९ धावा) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र वाढत्या धावगतीमुळे त्यांची झुंज अपयशी ठरली. हैदराबादकडून प्रफुल्ल हिंगेने ४ ओव्हरमध्ये ३४ धावा देत ४ बळी टिपले, तर साकिब हुसैनने देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ४ ओव्हरमध्ये २४ धावा देत ४ फलंदाजांना बाद केले. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आहे.