IPL 2026: बीसीसीआयचा मोठा निर्णय! निवडणुकीमुळे आयपीएलचे वेळापत्रक बदलले; ‘या’ दोन सामन्यांच्या ठिकाणात बदल
आयपीएल २०२६ चा हंगाम सध्या रंगात आला असून २० हून अधिक सामने पूर्ण झाले आहेत. सर्व संघ विजयासाठी झुंजत असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक धक्कादायक निर्णय घेत स्पर्धेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल केला आहे. विशेषतः चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील दोन मोठ्या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणांची (Venue) अदलाबदल करण्यात आली आहे.
निवडणुकीचा फटका; अहमदाबादचा सामना आता चेन्नईत
बीसीसीआयने १३ एप्रिल रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून या बदलांची माहिती दिली. मूळ वेळापत्रकानुसार, गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील पहिला सामना २६ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता. मात्र, आता हा सामना अहमदाबादऐवजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळवला जाईल. २६ एप्रिल रोजी अहमदाबादसह गुजरातच्या अनेक भागांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांमुळे निर्माण होणारी सुरक्षा व्यवस्थेची अडचण लक्षात घेऊन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
वेळापत्रकातील अदलाबदल आणि वेन्यूचे गणित
या बदलामुळे आता या दोन्ही संघांमधील सामन्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. २६ एप्रिलला होणारा पहिला सामना आता चेन्नईत होईल, तर या दोन्ही संघांमधील जो दुसरा सामना चेन्नईत नियोजित होता, तो आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि गुजरातमध्ये होणाऱ्या नगर निकाय निवडणुकांमुळे बीसीसीआयला हा ऐनवेळचा बदल करावा लागला आहे. वेळापत्रकातील या बदलामुळे दोन्ही संघांच्या प्रवासाच्या नियोजनावरही परिणाम होणार आहे.
CSK आणि GT: हंगामातील आतापर्यंतची कामगिरी
यंदाच्या हंगामात चेन्नई आणि गुजरात या दोन्ही बलाढ्य संघांची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला सुरुवातीच्या सलग ३ सामन्यांत पराभवाचा धक्का बसला होता. चौथ्या सामन्यात विजय मिळवून त्यांनी आपले खाते उघडले. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनेही पहिले दोन सामने गमावले होते, मात्र त्यानंतर सलग दोन सामने जिंकून त्यांनी लय पकडण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत या दोन्ही संघांमधील आगामी लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
