IPL 2026: हैदराबादच्या मैदानात अचानक ‘ब्लॅकआउट’! भर सामन्यात फ्लड लाईट्स बंद झाल्याने गोंधळ; पाहा काय घडले?
आयपीएल २०२६ मधील २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एक अतिशय दुर्मिळ आणि धक्कादायक घटना घडली. हैदराबादच्या डावादरम्यान अचानक स्टेडियममधील सर्व फ्लड लाईट्स बंद झाल्याने संपूर्ण मैदानात अंधार पसरला आणि काही काळ खेळ थांबवावा लागला.
मैदानात अचानक पसरला काळोख
ही घटना हैदराबादच्या डावादरम्यान घडली, जेव्हा कर्णधार ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन मैदानात फलंदाजी करत होते. अचानक स्टेडियमच्या दिव्यांनी साथ सोडली आणि संपूर्ण ‘ब्लॅकआउट’ झाल्याने खेळाडूंसह प्रेक्षकही अवाक झाले. काही मिनिटे खेळ थांबल्यानंतर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि पुन्हा एकदा फ्लड लाईट्स सुरू झाल्या. दिवे लागताच प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि सामना पुन्हा सुरू करण्यात आला.
ईशान किशनचे पुनरागमन
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. कर्णधार ईशान किशनने केवळ ४४ चेंडूत ९१ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यात ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. त्याला हेनरिक क्लासेन (४० धावा) आणि नितीश कुमार रेड्डी (२८ धावा) यांनी मोलाची साथ दिली. अखेरीस सलिल अरोडाच्या नाबाद २४ धावांमुळे हैदराबादने २० षटकांत ६ बाद २१६ धावांचा डोंगर उभा केला. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चरने २ बळी घेतले.
अजिंक्य राजस्थानला रोखण्याचे आव्हान
२००८ ची चॅम्पियन राजस्थान रॉयल्स सध्या या हंगामात अजिंक्य आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ४ ही सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांनी चेन्नई, मुंबई, बेंगळुरू आणि गुजरात सारख्या दिग्गज संघांना धूळ चारली आहे. आता २१७ धावांचे मोठे लक्ष्य गाठून राजस्थान आपला विजयरथ कायम राखणार की हैदराबाद त्यांना घरच्या मैदानात रोखणार, याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
