VIDEO: फिन ॲलनचा झेल वादाच्या भोवऱ्यात! आऊट की नॉट आऊट? सोशल मीडियावर अंपायरच्या निर्णयावर संताप

WhatsApp Group

कोलकाता: ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात एका वादग्रस्त निर्णयाने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. केकेआरचा सलामीवीर फिन ॲलन ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. लखनऊच्या दिग्वेश सिंह राठीने घेतलेला झेल कायदेशीर होता की नाही, यावरून क्रिकेट विश्वात दोन गट पडले असून मैदानावरील पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बाउंड्री लाईनवर नेमकं काय घडलं?

केकेआरच्या डावातील दुसऱ्या षटकात लखनऊचा गोलंदाज प्रिन्स यादव याच्या चेंडूवर फिन ॲलनने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने हवेत उडाला. तिथे फिल्डिंग करत असलेल्या दिग्वेश सिंह राठीने धावत जाऊन शानदार झेल टिपला. मात्र, झेल घेताना दिग्वेशचा पाय बाउंड्री लाईनच्या अत्यंत जवळ होता. रिप्ले आणि काही कॅमेरा अँगलवरून दिग्वेशचा पाय बाउंड्री लाईनला स्पर्श करत असल्याचा संशय येत होता. विशेष म्हणजे, झेल पकडल्यानंतर बाउंड्रीवरील जाहिरातीचा पडदाही थोडा हलल्याचे दिसून आले, जे पाय टेकल्याचे संकेत असू शकतात.

थर्ड अंपायरकडे का गेली नाही दाद?

या संपूर्ण वादात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मैदानावरील पंचांनी या निर्णयासाठी थर्ड अंपायरची मदत घेण्याचे टाळले. आधुनिक क्रिकेटमध्ये जिथे प्रत्येक इंच तपासला जातो, तिथे इतक्या जवळचा निर्णय पंचांनी स्वतःच दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, फलंदाज फिन ॲलननेही अंपायरच्या निर्णयावर फारसा आक्षेप न घेता पॅव्हेलियनची वाट धरली. जर ॲलनने तिथेच थांबून रिव्ह्यूची किंवा तपासणीची मागणी केली असती, तर चित्र वेगळे असू शकले असते.

सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांनी पंचांवर सडकून टीका केली आहे. “इतक्या मोठ्या स्पर्धेत तांत्रिक मदतीचा वापर का केला गेला नाही?” असा सवाल चाहते विचारत आहेत. या वादग्रस्त विकेटमुळे केकेआरची सुरुवात खराब झाली आणि फिन ॲलन अवघ्या ९ धावांवर बाद झाला. या एका निर्णयाचा सामन्याच्या निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.