25 कोटींचा ‘ग्रीन’ वादळ! कॅमरनने थेट कारवरच ठोकला षटकार; आता कंपनी गरिब मुलांच्या शिक्षणासाठी मोजणार लाखो रुपये
आयपीएल २०२६ मधील सर्वात महागडा परदेशी खेळाडू कॅमरन ग्रीन अखेर फॉर्ममध्ये परतला आहे. २५.२ कोटी रुपयांची विक्रमी बोली लागलेल्या ग्रीनवर गेल्या ५ सामन्यांतील अपयशामुळे टीकेची झोड उठत होती. मात्र, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. या सामन्यात ग्रीनने केवळ अर्धशतकच ठोकले नाही, तर त्याने मारलेला एक ‘विस्फोटक’ षटकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
थेट कारवर आदळला चेंडू! कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ग्रीनने १३ व्या षटकात हा पराक्रम केला. अशोक शर्माच्या तिसऱ्या चेंडूवर ग्रीनने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक उत्तुंग षटकार खेचला. हा चेंडू थेट स्टेडियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या टाटा (TATA) कंपनीच्या कारवर जाऊन आदळला. चेंडू इतक्या वेगाने होता की, कारच्या साईड मिररच्या खाली एक मोठा ‘डेंट’ (खड्डा) पडला. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
एका षटकारामुळे गरिब मुलांचे नशीब फळफळले! ग्रीनच्या या शॉटमुळे कारचे नुकसान झाले असले, तरी यामुळे गरजू मुलांचा मोठा फायदा झाला आहे. आयपीएलचे प्रायोजक असलेल्या टाटा कंपनीने एक विशेष मोहीम राबवली आहे. या नियमानुसार, जर फलंदाजाचा चेंडू थेट प्रदर्शनातील कारला लागला, तर कंपनी ५ लाख रुपये अशा मुलांसाठी खर्च करेल ज्यांना क्रिकेट खेळायची इच्छा आहे पण त्यांचे कुटुंब किट खरेदी करण्याचा खर्च उचलू शकत नाही. ग्रीनच्या या एका षटकारामुळे आता अनेक मुलांच्या हातात क्रिकेट किट येणार आहे.
ग्रीनची ‘विराट’ खेळी सुरुवातीला संथ खेळणाऱ्या ग्रीनने एकदा लय पकडल्यानंतर गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. एकवेळ २८ चेंडूत २७ धावांवर खेळणाऱ्या ग्रीनने ३४ चेंडूत आपले मोसमातील पहिले अर्धशतक पूर्ण केले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने ५५ चेंडूत ७९ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौके आणि ४ उत्तुंग षटकार खेचले. त्याच्या या खेळीच्या जोरावर कोलकाता संघ १८० धावांपर्यंत मजल मारू शकला.
