IPl 2025: केएल राहुलची खेळी व्यर्थ, गुजरातने 10 गडी राखत दिल्लीला चारली धूळ

WhatsApp Group

IPL 2025 DC VS GT: आयपीएल २०२५ मध्ये, डबल हेडरमधील दुसरा सामना रविवारी (१८ मे) रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर १९९ धावा केल्या होत्या. तथापि, साई सुदर्शनच्या तुलनेत केएल राहुलची खेळी फिकी पडली. त्याने स्फोटक शतक झळकावून गुजरातच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

साई सुदर्शनचे वादळ

साई सुदर्शनने दिल्लीविरुद्ध शानदार खेळी केली. तो सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत होता. दिल्लीविरुद्ध सुदर्शनची बॅट जोरात बोलली. त्याने ६१ चेंडूत १०८ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये १२ चौकारांव्यतिरिक्त ४ षटकारांचा समावेश होता. याशिवाय शुभमन गिलनेही ५३ चेंडूत ९३ धावांची खेळी केली. दोघांच्याही स्फोटक खेळीमुळे जीटीने हा सामना १० विकेट्सने जिंकला. या विजयासह, जीटीने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे.

गुजरातचा ऐतिहासिक विजय

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ३ विकेट गमावून १९९ धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर केएल राहुलने नाबाद शतक झळकावले. त्याने ६५ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह ११२ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय अभिषेक पोरेलने १९ चेंडूत ३० धावा केल्या. कर्णधार अक्षर पटेलने १६ चेंडूत २५ धावा केल्या. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने १० चेंडूत २१ धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातलाही चांगली सुरुवात मिळाली. गिलच्या अर्धशतकाच्या आणि साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातने १९ षटकांत १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. २०० धावांचा पाठलाग करताना १० विकेट्सनी विजय मिळवणारा गुजरात पहिला संघ ठरला.