IPL 2023: गुजरात टायटन्सला मोठा झटका, संपूर्ण हंगामातून हा स्टार खेळाडू बाहेर

WhatsApp Group

IPL 16 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दणदणीत विजय मिळवून सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार खेळाडू केन विल्यमसन आता संपूर्ण हंगामामधून बाहेर पडला आहे. गतविजेत्या गुजरातसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. फ्रँचायझीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, आम्हाला दुःखाने कळवावे लागते की केन विल्यमसन आता संपूर्ण आयपीएल 2023 मधून बाहेर आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या मोसमातील सलामीच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. आम्ही आमच्या टायटनला लवकर बरे होण्यासाठी आणि जलद पुनरागमनासाठी शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे सीमारेषेवर शॉट थांबवण्याच्या प्रयत्नात केन जखमी झाला. त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यात एसीएलला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे तो 2-3 महिने बाहेर राहू शकतो.

विल्यमसनला दुखापत कशी झाली?
गुजरातचा 2023 सीझनचा पहिला सामना CSK विरुद्ध झाला होता. चेन्नईच्या डावातील 13वे षटक जोशुआ लिटल टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सीएसकेचा फलंदाज रुतुराज गायकवाडने एक लांबलचक फटका मारला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या केन विल्यमसनने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत चेंडू पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यावेळी त्याला दुखापत झाली. केनने शानदार क्षेत्ररक्षण करत संघाच्या 2 धावा वाचवल्या पण तो उठून स्वतःच्या पायावर उभा राहू शकला नाही आणि स्वतः चालताही आला नाही.

गुजरात टायटन्ससाठी पहिल्या सामन्यात विल्यमसन फलंदाजी करू शकला नाही आणि साई सुदर्शनला प्रभावशाली खेळाडू म्हणून आणण्यात आले. आता त्याच्या जाण्याने संघाची मधली फळी कमकुवत झाली आहे. फ्रँचायझी बदलीची घोषणा करते की नाही हे पाहावे लागेल. ती आली तरी बदली कोण होणार हे पाहणेही रंजक ठरणार आहे. डेव्हिड मिलर नॅशनल ड्युटीमुळे पहिला सामना खेळू शकला नाही. 4 एप्रिलला गुजरातचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्यानंतर मिलर येईल आणि संघाचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.