IPL 2022: खबरदार! बायो बबलचे उल्लंघन केल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम

WhatsApp Group

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपला सराव सुरु केला आहे. स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. बीसीसीआयने तेच लक्षात घेत अत्यंत कठोर नियमावली तयार केली आहे.

बायो बबल संदर्भात BCCI ने कठोर नियम बनवले आहेत. बायो बबलचे नियम मोडल्यास त्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी घालण्यात येणार आहे. तसेच संघाचे गुण कापण्यात येतील त्याशिवाय एक कोटी रुपयापर्यंत दंड ठोठावण्याची तरतूदही नियमामध्ये करण्यात आली आहे.
टीमला ठोठवणार एक कोटीचा दंड, गुणही कापणार

आयपीएल 2022 दरम्यान जाणूनबुजून कोणत्याही व्यक्तीला टीमने बायो बबलमध्ये आणले, तर शिक्षा म्हणून एक कोटी रुपयापर्यंत रक्कम भरावी लागणार आहे. अशी चूक पुन्हा झाली, तर टीमचे एक ते दोन पॉईंट कापले जातील.

खेळाडूने बायो बबलचा नियम मोडला तर काय होईल?

पहिल्यांदा बायो बबल मोडल्यास त्या खेळाडूला सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावं लागेल. त्याशिवाय तो जितके सामने खेळणार नाही, त्याचे पैसे सुद्धा त्याला मिळणार नाही. दुसरी चूक केल्यास खेळाडूला सात दिवसाच्या क्वारंटाइन बरोबर एक मॅचच्या बंदीचाही सामना करावा लागणार आहे. तिसऱ्यांदा बायो बबलचे उल्लंघन केल्यास संपूर्ण मोसमासाठी बाहेर केले जाईल व संघाला कुठली रिप्लेसमेंटही मिळणार नाही.

खेळाडूच्या कुटुंबाने बायो बबल तोडले तर?

पहिली चूक केल्यास खेळाडूच्या कुटुंबातील सदस्याला सात दिवस क्वारंटाइनमध्ये रहावं लागणार. दुसरी चूक केल्यास खेळाडूचे कुटुंब, मित्रांना बायोबबल मधून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार तसेच त्याच्याशी संबंधित खेळाडूला सात दिवस क्वारंटाइन मध्ये राहावे लागणार.पहिली चूक केल्यास त्या संघाला दंड म्हणून एक कोटी रुपये भरावे लागतील. दुसरी चूक केल्यास एक गुण कापला जाईल आणि तिसरी चूक केल्यास दोन गुण कापले जातील.