देशाशी गद्दारी करण्यापेक्षा मी माझा जीव देईन, पाहा शमीचा भावूक व्हिडीओ

WhatsApp Group

टी20 विश्वचषक 2021 च्या सुपर 12 फेरीतील पहिल्यात सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. हा सामना संपल्यानंतर भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात होते. काही चाहत्यांनी तर आपल्या मर्यादा ओलांडत शमीविरोधात सोशल मीडियावर वाईट पोस्ट लिहील्या होत्या.

याचदरम्यान शमीचा एक जुना व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, या व्हिडीओत तो म्हणतोय की ‘देशाची फसवणूक करण्याऐवजी मी मरणं पसंत करेन. 2018 मध्ये मोहम्मद शमीच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला होता. त्याची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर घरगुती हिंसाचारसह मॅच फिक्सिंगसारखा गंभीर आरोप लावला होता. त्यावेळीचा हा व्हिडीओ असल्याचे म्हटले जात आहे.


त्यावेळी शमीने पत्नीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, सर्वात मोठा प्रश्न तर माझ्यावर निर्माण झाला आहे. देशाची फसवणूक करण्याचा प्रश्न मनात आला तर तसं करण्याऐवजी मला माझा जीव द्यायला आवडेल.

गेल्या काही वर्षांमध्ये मोहम्मद शमी हा भारतीय क्रिकेट संघासाठी सर्व फॉरमॅटमध्ये खेळणारा महत्वाचा गोलंदाज आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याने 3.5 षटके टाकताना एकही विकेट न घेता 43 धावा दिल्या होत्या. विषेश म्हणजे या सामन्यात कोणत्याच भारतीय गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नव्हते.

पाकिस्तानकडून झालेल्या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाचा पुढिल सामना हा न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हा सामना 31 ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सामना भारताला जिंकावा लागणार आहे.