
बिहारमधील खगरिया येथे दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे रुळावर रील बनवत असताना रेल्वेची धडक बसल्याने दोन तरूणांनी आपला जीव गमावला आहे. यादरम्यान मोबाईलवरून शूटिंग करणाऱ्या तिसऱ्या मित्राने पुलावरून खाली उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र तो गंभीर जखमी झाला. इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी तीन मित्र रेल्वे ट्रॅकवर गेले होते. त्याचवेळी मागून ट्रेन आली त्यामुळे धडक बसून दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागारात पाठवला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मृतांच्या घरावर शोककळा पसरली आहे.
नितीश कुमार (17 वर्षीय) आणि सोनू कुमार (16 वर्षीय) अशी मृतांची नावे आहेत, तर पुलावरून उडी मारून जीव वाचवणाऱ्या तरुणाचे नाव अमर कुमार (20 वर्षीय) आहे.