भारताला ऐतिहासिक ‘दक्षिण’ दिग्विजयाची संधी! विराटसेना इतिहास रचणार का?
भारतीय क्रिकेट संघाची पोतडी श्रीमंतीने भरलेली आहे. त्यात वनडे आणि टि२० विश्वचषक आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, एशिया कप आहे, अगदी श्रीलंका-वेस्टइंडीज पासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पर्यंत सर्व देशात जिंकलेल्या कसोटी मालिका आहेत. मात्र अजून एका मोठ्या कसोटी संघाच्या मायभूमीवर भारताला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही आणि तो देश म्हणजे दक्षिण आफ्रिका. २६ डिसेंबर पासून सुरु झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना भारताने तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. आजपासून सुरू झालेला तिसरा सामना जिंकून भारताला दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रोनच्या कोविड-१९ विषाणूचा हाहा:कार माजला आहे. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा ही तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंचुरियन, दुसरा सामना जोहान्सबर्ग तर तिसरा सामना केपटाउन येथे खेळला जाणार आहे.
जाणून घेऊयात भारताची दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी आणि काही महत्त्वाची आकडेवारी
- भारताने आजवरदक्षिण आफ्रिकेत खेळलेले एकूण कसोटी सामने: २२, विजय: ४, पराभव: ११, अनिर्णीत: ७.
- दक्षिण आफ्रिकेत भारताची सर्वोच्च धावसंख्या : ४५९, सेंचुरियन २०१०
- दक्षिण आफ्रिकेत भारताचा नीचांक : ६६ सर्वबाद, डर्बन १९९६
- भारतातर्फे दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा : सचिन तेंडुलकर, ११६१ धावा, १५ सामने
- भारतातर्फे दक्षिण आफ्रिकेत घेतलेले सर्वाधिक बळी : अनिल कुंबळे, ४५ बळी, १२ सामने
- भारताने दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या एकूण कसोटी मालिका : ७, सहा मध्ये पराभव आणि २०१० मध्ये एक अनिर्णीत
भारताचे दक्षिण आफ्रिकेतील आजवरचे ४ कसोटी विजय
२००६, जोहान्सबर्ग – राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्या अनुभवी खेळींच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २४९ धावा केल्या. श्रीशांतच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ८४ धावांवर गडगडला. श्रीशांतने ४० धावा देत ५ बळी घेतले.
दुसऱ्या डावात लक्ष्मणने ७३ धावांची खेळी केली. भारताने २३६ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर ४०२ धावांचे लक्ष ठेवले. झहीर खान, इशांत शर्मा आणि अनिल कुंबळे या तिघांनीही ३-३ बळी घेत भारताला १२३ धावांनी विजय मिळवून दिला.
२०१०, डर्बन – या कसोटी सामन्यात कोणत्याच भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि भारताचा डाव केवळ २०५ धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ५० धावा देत ६ बळी घेतले. यावेळी गोलंदाजीत झहीर खानने आपली चमक दाखवली आणि ३ बळी घेतले. हरभजन सिंगने नंतर आफ्रिकेचे शेपूट गुंडाळत १० धावांमध्ये ४ बळी घेतले.
भारताकडे ७३ धावांची लढत होती. दुसऱ्या डावामध्ये लक्ष्मणच्या ९६ धावांच्या अफलातून खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ३०३ धावांचे लक्ष ठेवले. इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ टिकाव धरू शकला नाही. झहीर खान आणि हरभजन सिंग यांनी मिळून भारताला ८७ धावांनी विजय मिळवून दिला.
२०१८, जोहान्सबर्ग – या कसोटीमध्ये गोलंदाजीला अनुकूल वेगवान अशी खेळपट्टी तयार करण्यात आली होती. भारताने पहिल्या डावात १८७ तर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या डावात १९४ धावा केल्या. तिसऱ्या डावांमध्ये चेंडू विचित्ररित्या उसळत होते. मात्र कर्णधार विराट कोहलीने अशा परिस्थितीत सुद्धा फलंदाजी करत राहण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेने येऊन चौफेर फटकेबाजी करत ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान ठेवले.
२०२१ सेंचुरियन – ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या म्हणजे सेंचुरियन येथे झालेल्या कसोटी सामन्यात भाराताने दक्षिण आफ्रिकेवर ११३ धावांनी दमदार विजय मिळवला होता.