WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे टीम इंडिया अडचणीत, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये श्रीलंकेने टाकले मागे

WhatsApp Group

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या दणदणीत पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये नंबर 1चा मुकुट गमावला आहे. यजमानांनी दुसऱ्या कसोटीत कांगारूंचा एक डाव आणि 39 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर श्रीलंका 54.17 टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या विजयामुळे पाकिस्तान आणि भारताची एका स्थानानं घसरण झाली आहे. पाकिस्तान 52.38 टक्केवारीसह चौथ्या आणि भारत 52.08 टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेच्या विजयामुळे भारताचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील मार्ग आता कठीण झाला आहे.

भारताला आता WTC च्या दुसऱ्या फेरीत आणखी 6 सामने खेळायचे आहेत आणि अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे, तर इतर दोन सामने बांगलादेशविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत.