
Commonwealth Games 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रीडा 2022 च्या त्यांच्या तिसऱ्या सामन्यात बार्बाडोस संघाचा 100 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाकडून गमावला होता. मात्र त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचा आठ विकेट्स राखून पराभव केला होता. धावांच्या बाबतीत भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंड किंवा न्यूझीलंडशी होणार आहे. जर भारताने उपांत्य फेरीत विजय मिळवला तर ते अंतिम फेरीत आणि हरले तरी पदकाच्या शर्यतीत कायम राहील. कांस्यपदकाची लढत रविवारीच अंतिम फेरीपूर्वी होणार आहे.
बर्मिंगहॅममध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 4 बाद 162 धावा केल्या आणि त्यानंतर बार्बाडोस संघाला 20 षटकांत 8 बाद 62 धावांवर रोखले. भारताकडून रेणुका सिंह ठाकूरने भेदक गोलंदाजी करताना चार षटकांत 10 धावा देऊन चार बळी घेतले. 1998 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला तेव्हा भारतीय पुरुष संघाने फक्त एक सामना जिंकला आणि उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले होते. आता भारतीय महिला संघाने त्यांना मागे टाकत उपांत्य फेरी गाठली आहे.
A fantastic victory for #TeamIndia.
They win by 100 runs and advance into the semi-finals at the #CWG2022 👏👏
Scorecard – https://t.co/upMpWogmIP #INDvBAR #B2022 pic.twitter.com/uH6u7psVmG
— BCCI Women (@BCCIWomen) August 3, 2022
भारताकडून मिळालेल्या 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बार्बाडोसची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि संघाने वेळोवेळी विकेट्स गमावल्या. बार्बाडोससाठी किशोना नाइट आणि शकीरा सेलमन यांनी अनुक्रमे 16 आणि नाबाद 12 धावा केल्या. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भारताकडून रेणुकाने अप्रतिम गोलंदाजी करताना चार बळी घेतले. ठाकूरने डिआंड्रा डॉटिन, कर्णधार हेली मॅथ्यूज, किसिया नाइट आणि आलिया अॅलन यांना आपले शिकार बनवले. त्यांच्याशिवाय मेघना सिंग, स्नेह राणा, राधा यादव आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 4 गडी गमावून 162 धावा केल्या. संघाकडून शफाली वर्माने 26 चेंडूंत सात चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या, तर जेमिमा रॉड्रिग्जने 46 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकारासह 56 धावांची नाबाद खेळी केली. दीप्ती शर्मानेही नाबाद 34 धावा केल्या. जेमिमाचे हे सातवे अर्धशतक आहे. जेमिमाह आणि दीप्ती यांनी पाचव्या विकेटसाठी 70 धावांची शानदार भागीदारी केली.