IPL 2022 : ‘या’ दिवशी सुरू होणार आयपीएल, मुंबईत होतील 55 सामने

WhatsApp Group

मुंबई : 26 मार्चपासून आयपीएल २०२२ स्पर्धा खेळण्यात येणार आहे  IPL begin on March 26. आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्सने 26 मार्चला शनिवार असल्यामुळे या दिवसापासून स्पर्धा सुरू करण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआयकडे (BCCI) केली होती. शनिवारी आयपीएल सुरू केल्यामुळे रविवारी दोन सामने खेळवता येतील, म्हणजेच पहिल्या दोन दिवसांमध्ये तीन सामने होतील, ज्याचा फायदा जास्त होईल, असे स्टार स्पोर्ट्सचे म्हणणे होते. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचे वृत्त क्रिकबझने दिले आहे.

कोरोना व्हायरस आणि कठोर बायो-बबलच्या नियमांमुळे प्रवास कमी करण्यासाठी यंदाची आयपीएल महाराष्ट्रामध्येच खेळवली जाणार आहे. वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईचे डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्याच्या गहुंजेमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जातील. आयपीएलच्या 70 सामन्यांपैकी 55 सामने मुंबईमध्ये तर 15 सामने पुण्यात खेळवल्या जाणार आहेत.


कोरोना महामारीमुळे आयपीएल 2020 चा संपूर्ण मोसम हा युएईमध्ये खेळवला गेला, तर आयपीएल 2021 ला भारतात सुरूवात झाली, पण टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मे महिन्यामध्ये स्पर्धा स्थगित करावी लागली होती. त्यामुळे उरलेले सामने सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये खेळवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा आयपीएलचे भारतात आगमन झाले आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दोन टीम वाढल्या आहेत, त्यामुळे आता आयपीएल स्पर्धा 10 टीमची असेल. टीम वाढल्यामुळे स्पर्धेचे दिवसही वाढणार आहेत. आयपीएलच्या वेळापत्रकाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. आयपीएल 2022 साठीचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला पार पडला, त्यामुळे यंदा टीम नव्या खेळाडूंसह मैदानात उतरणार आहेत.