गंभीरला ISIS काश्मीरकडून पुन्हा जीवे मारण्याची धमकी, गेल्या 6 दिवसात तिसऱ्यांदा आली धमकी

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर आणि भाजपचा दिल्लीचा विद्यमान खासदार गौतम गंभीर याला पुन्हा एकदा ISIS काश्मीरकडून (ISIS Kashmir) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये दिल्ली पोलिसांनाही आव्हान देण्यात आले आहे.

गंभीरला शनिवारी उशिरा रात्री 1:37 वाजता ISISKashmiratdateyahoo.com वरून एक ईमेल आला, ज्यामध्ये लिहिले होते, तुमचे दिल्ली पोलिस आणि IPS अधिकारी श्वेता (पोलीस उपायुक्त) आमचं काहीही बिघडवू शकत नाहीत. या संदर्भात माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना ई-मेलमधील मजकूर मिळाला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधी या आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी गौतम गंभीरला अशाच धमक्या आल्या होत्या.


गंभीरचे पर्सनल सेक्रेटरी गौतम अरोरा यांनी पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री 9:32 वाजता गंभीरला त्याच्या ईमेल आयडीवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ISIS काश्मीरने पाठवलेल्या ई-मेलमध्ये, आम्ही तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार करू, अशी धमकी दिली आहे.

दिल्ली सेंट्रलच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान म्हणाल्या, आम्हाला तक्रार मिळाल्यानंतर, जिल्हा पोलिसांनी गंभीरच्या वैयक्तिक सुरक्षा आणि राजेंद्र नगर भागातील त्याच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

त्यानंतर लगेचच, पोलिसांनी गुगलला पत्र लिहून ज्या ईमेल आयडीवरून धमकीचे मेल पाठवले होते. त्या ईमेल आयडीच्या ऑपरेटरसह संबंधित माहिती मागवली आहे. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 2:32 वाजता त्याच ई-मेल आयडीवरून गंभीरला दुसऱ्यांदा धमकी देण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्तांना फोनवरून देण्यात आली.


दुसऱ्या ई-मेलमध्ये गंभीरच्या राहत्या घराचा व्हिडिओही जोडण्यात आला आहे. तसेच या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, आम्हाला तुला मारायचे होते, पण तू काल वाचलास. जर तुला तुझ्या कौटुंबांवर प्रेम असेल तर राजकारण आणि काश्मीरच्या गोष्टींपासून दूर राहा.