
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कॅनडावर 8-0 असा शानदार विजय नोंदवून आपली चांगली कामगिरी सुरू ठेवली. बुधवारी खेळल्या गेलेल्या त्यांच्या तिसऱ्या पूल ब सामन्यात, भारताने हाफ टाईमला 4-0 अशी आघाडी घेतली आणि नंतर दुसऱ्या हाफमध्ये आणखी चार गोल करून 8-0 असा एकतर्फी विजय नोंदवला. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर अमित रोहिदास, ललित उपाध्याय, गुरजंत सिंग आणि मनदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला.
या विजयानंतर भारतीय संघाने आपल्या पूलमध्ये अव्वल स्थान पटकावण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ब गटात अव्वल स्थानासाठी इंग्लंडला आता पुढील सामना 12-0 अशा फरकाने जिंकावा लागेल. जर इंग्लंड तसे करू शकला नाही, तर भारतीय संघ त्यांच्या गट ब मध्ये अव्वल स्थानी राहील. CWG 2022 मध्ये भारताने 23 गोल केले आहेत, तर इंग्लंडने आतापर्यंत केवळ 14 गोल केले आहेत.
India win! 🇮🇳 They beat Canada by 8-0 in their 3rd Group match to move on the top of Group table. #CWG2022 #Hockey 🏑 pic.twitter.com/xPfyrOGZkr
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 3, 2022
कॅनडाविरुद्धच्या या सामन्यात भारत सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. सातव्या मिनिटाला उपकर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. यानंतर काही वेळातच अमितने चेंडू नेटकडे नेला आणि भारताची आघाडी 2-0 अशी केली. दुसऱ्या क्वार्टरच्या सहाव्या मिनिटाला ललितने शानदार गोल करत सामना कॅनडाच्या पकडीपासून दूर नेला. चौथा गोल गुरुदासने केला तर पाचवा गोल आकाशदीपने केला. सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांत हरमनप्रीत, मनदीप आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात भर घातली. भारताचा आता पुढील सामना 4 ऑगस्ट रोजी वेल्सशी होणार आहे.