Viral Video: “सिंगापूरमध्ये मध्यरात्री 3 वाजताही मी सुरक्षित!”; भारतीय तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, महिला सुरक्षेवरून इंटरनेटवर चर्चा
भारतात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे ही आजही अनेक भारतीय मुलींसाठी भीतीदायक गोष्ट असते. मात्र, सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणीने शेअर केलेल्या व्हिडिओने महिला सुरक्षेबाबत एक नवीन चर्चा सुरू केली आहे. कृतिका जैन नावाच्या या तरुणीने मध्यरात्री ३ वाजता सिंगापूरच्या रस्त्यावरून एकटीने चालतानाचा आपला अनुभव शेअर केला असून, तो पाहून भारतीय नेटकऱ्यांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ना भीती, ना दडपण; फक्त सुरक्षिततेची जाणीव
कृतिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती रात्रीच्या ३ वाजता आरामात घरी जाताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा दडपण नाही, की तिला मागे वळून पाहण्याची गरज भासत नाहीये. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सिंगापूरमध्ये मध्यरात्रीचे ३ वाजले आहेत आणि मी घरी चालली आहे. मला अजिबात भीती वाटत नाहीये. भारतात तर मी या वेळी एकटी बाहेर पडण्याचा विचारही करू शकत नाही. पण इथे हे अगदी सामान्य वाटते.”
View this post on Instagram
सिंगापूरच्या गगनचुंबी इमारतींपेक्षा ‘सुरक्षा’ महत्त्वाची
कृतिकाने पुढे नमूद केले की, तिला सिंगापूर हे शहर तिथल्या पर्यटनामुळे किंवा मोठ्या इमारतींमुळे आवडत नाही, तर तिथल्या सुरक्षिततेमुळे आवडते. तिने म्हटले, “सुरक्षेची ही पातळी माझ्यासाठी कोणतीही चैन नसून ते इथल्या जीवनाचा नियमित भाग आहे. याच गोष्टीमुळे मी या शहराच्या प्रेमात पडले आहे.” तिच्या या प्रांजळ कबुलीने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुरक्षिततेची ही जाणीव कोणत्याही व्यक्तीसाठी, विशेषतः महिलांसाठी सर्वात महत्त्वाची असते, हेच तिच्या व्हिडिओतून अधोरेखित झाले आहे.
भारतीय महिलांनी व्यक्त केली हळहळ
हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला असून त्यावर नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक भारतीय महिलांनी यावर कमेंट करताना सांगितले की, हा व्हिडिओ पाहून एका बाजूला आनंद झाला, तर दुसऱ्या बाजूला भारतात अशी परिस्थिती नसल्यामुळे दुःखही झाले. एका युजरने लिहिले, “मी सिंगापूरमध्ये राहिली आहे आणि हे १०० टक्के खरे आहे.” तर दुसऱ्याने म्हटले, “भारतातील शहरांनी सिंगापूरकडून हा धडा शिकण्याची गरज आहे.” कृतिकाच्या या व्हिडिओमुळे ‘जागतिक दर्जाची सुरक्षा’ म्हणजे नक्की काय असते, याचे दर्शन भारतीयांना घडले आहे.
