Crime News: चाकूने सपासप वार… अमेरिकेत भारतीय तरुणीची निर्घृण हत्या! माजी प्रियकराच्या फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह; आरोपी भारतात पसार
वॉशिंग्टन: अमेरिकेतील मेरीलँड राज्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या २७ वर्षीय निकिता गोडिशला या भारतीय तरुणीचा मृतदेह तिच्याच माजी प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, निकिताच्या हत्येचा आरोप असलेल्या तिच्या माजी प्रियकराने स्वतःच पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर तो विमानाने भारतात पळून गेला आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात मोठी खळबळ उडाली आहे.
बेपत्ता झाल्याची तक्रार अन्…
निकिता गोडिशला ही २ जानेवारीपासून बेपत्ता होती. तिचा २६ वर्षीय माजी प्रियकर अर्जुन शर्मा यानेच पोलिसांना माहिती दिली होती की, त्याने निकिताला शेवटचे ३१ डिसेंबर रोजी कोलंबिया, मेरीलँड येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये पाहिले होते. मात्र, पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा एक भयंकर वास्तव समोर आले. अर्जुनने ज्या दिवशी निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, त्याच दिवशी म्हणजेच २ जानेवारीला तो अमेरिकेतून भारताकडे जाणाऱ्या विमानाने पसार झाला.
अपार्टमेंटच्या झडतीत धक्कादायक वास्तव समोर
पोलिसांनी संशयावरून ३ जानेवारी रोजी अर्जुनच्या अपार्टमेंटची झडती घेतली असता, तिथे निकिताचा मृतदेह आढळून आला. निकिताच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अर्जुनने ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास निकिताची हत्या केली असावी आणि त्यानंतर दोन दिवस मृतदेह घरातच ठेवून तो भारतात पळून गेला. हॉवर्ड काउंटी पोलिसांनी आता अर्जुन शर्माविरुद्ध फर्स्ट आणि सेकंड-डिग्री मर्डरचा गुन्हा दाखल करून अटकेचे वॉरंट जारी केले आहे.
भारतीय दूतावास आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा सतर्क
या प्रकरणात वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाने हस्तक्षेप केला असून ते निकिताच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. दूतावासाने स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, अमेरिकन पोलीस आता फेडरल लॉ एनफोर्समेंट एजन्सींच्या मदतीने अर्जुनचा शोध घेत आहेत. अर्जुन शर्मा भारतात कोणत्या ठिकाणी लपला आहे, याचा तपास इंटरपोलच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र जुन्या वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
