रोहितच्या नेतृत्वाची कमाल, भारताने न्यूझीलंडला दिला 3-0 ने व्हाईटवॉश

WhatsApp Group

कोलकाता – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना भारताने 73 धावांनी जिंकून ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत टी20 विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला आहे. भारताने यापूर्वी झालेल्या दोन्ही टी20 सामन्यात दमदार विजय मिळवून या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली होती. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला.

भारताने जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला आणि त्यानंतर रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत ही मालिका आपल्या नावावर यापूर्वीच केली होती. आता सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 7 विकेट्स गमावत 184 धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारतासाठी इशान किशनने 29, श्रेयस अय्यरने 25, व्यंकटेश अय्यरने 20 धावांची खेळी केली, तर तळाच्या दीपक चहरने 21 आणि हर्षल पटेलने 18 धावांची खेळी करत सर्वाचं लक्ष वेधून घेतलं.

भारताने दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला आपल्या नावाला साजेल अशी कामगिरी करता आली नाही. मार्टिन गुप्टिल एकाकी झुंज देत 36 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 111 धावांवर गारद झाला. गोलंदाजीत भारतासाठी अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स पटकावल्यात, त्यापाठोपाठ हर्षल पटेलने 2 विकेट्स घेतल्यात. तर व्यंकटेश अय्यर, दीपक चहर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव केला होता. मात्र त्यांना विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव स्विकारावा लागला. या टी20 मालिकेनंतर दोन्ही संघामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 25 ते 29 नोव्हेंबरला कानपूरला तर दुसरा कसोटी सामना 3 ते 7 डिसेंबरला मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येईल. हे दोन्ही सामने सकाळी 9:30 वाजता सरू होतील.

या मालिकेसाठी असे होते दोन्ही संघ

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडचा संघ – टिम साउदी (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, अ‍ॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी.