Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. गुरुवार 5 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दुलीप ट्रॉफीमधूनही त्याने विश्रांती घेतली आहे. हा वेळ तो आपल्या कुटुंबासोबत घालवत असला तरी या काळात त्याने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. पत्नी रिवाबा यांच्यानंतर रवींद्र जडेजानेही राजकारणात प्रवेश केला आहे. जडेजाने भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. खुद्द गुजरातमधील भाजप आमदार रिवाबा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.
सध्या गुजरात आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप देशभरात सदस्यत्व मोहीम राबवत असून या मोहिमेअंतर्गत जडेजाही पक्षात सामील झाला आहे. रिवाबाने ‘एक्स’वरील तिच्या एका पोस्टद्वारे याची घोषणा केली. रिवाबाने सदस्यत्व प्रमाणपत्राचा फोटो पोस्ट केलाय. रवींद्र जडेजाने याआधी 2022 च्या गुजरात निवडणुकीतही पत्नीसाठी प्रचार केला होता.
टीम इंडिया जूनमध्ये टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर जडेजाने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तेव्हापासून तो क्रिकेट ॲक्शनपासून दूर आहे. गेल्या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर खेळलेल्या वनडे मालिकेतही त्याला स्थान मिळाले नव्हते. गुरुवारपासून सुरू झालेल्या दुलीप करंडक स्पर्धेत त्याची संघात निवड झाली होती, मात्र स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी त्याने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले.
कसोटी मालिकेतून पुनरागमन करेल
रवींद्र जडेजा आता या महिन्यात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये जडेजा संघाचा महत्त्वाचा भाग असेल. केवळ ही मालिकाच नाही तर त्यानंतर होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेतही त्याची मोठी भूमिका असेल. जडेजाने आतापर्यंत 72 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 294 विकेट घेतल्या आहेत, तर त्याच्या बॅटमधून 3036 धावाही आल्या आहेत.