भारतासाठी 2 विश्वचषक खेळणारा ‘हा’ दिग्गज खेळाडू IPL लिलावात होणार सहभागी!

WhatsApp Group

मुंबई – इंडियन प्रीमियर लीग 2022 (Indian Premier League 2022) चे मोसम फार रोमांचक होणार आहे. कारण आता IPL 2022 मध्ये 8 संघाऐवजी 10 संघ सहभागी होणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या महिन्यात अहमदाबाद आणि लखनौ या दोन नवीन संघांची नावेही जाहीर केली होती. आता पुढील हंगामापूर्वी मेगा लिलावही ( IPL 2022 Mega Auction ) आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत जुन्या आठ संघांना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतचेही पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न आहे. यासाठी तो आयपीएल 2022 च्या लिलावात आपले नाव नोंदवणार आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील बंदीनंतर मैदानात परतलेल्या श्रीशांतने आयपीएलच्या 2021 च्या लिलावातही आपले नाव समाविष्ट केले. श्रीशांतने आपली किंमत 75 लाख रुपये ठेवली होती. मात्र एकाही संघाने त्याचे नाव शॉर्टलिस्ट केले नव्हते.

आयपीएलमध्ये श्रीशांतने आजवर 44 सामने खेळताना 40 विकेट्स आपल्या नावावर केले आहेत. आयपीएलमध्ये श्रीशांत  पंजाब किंग्स, कोची टस्कर्स केरळा आणि राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळला आहे.

आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर घातलेली बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली. यानंतर श्रीशांतने केरळसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीशांत केरळकडून मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिसला होता. श्रीशांतने 2020-21 मध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये 6 सामने खेळताना 13 विकेट्स घेतल्या होत्या.

38 वर्षीय श्रीशांत 2007 टी-20 आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयी भारतीय संघाचा महत्वाचा भाग होता. भारतीय संघासाठी श्रीशांतने 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये श्रीशांतच्या नावावर 37.59 च्या सरासरीने 87 बळी आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 75 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 विकेट्स श्रीशांतच्या नावावर आहेत.