नवी दिल्ली – चीनच्या सैनिकांनी गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या शूर सैनिकांनी चीनच्या या प्रयत्नांना हाणून पाडत त्यांना हुसकावून लावले. ही घटना बुमला आणि यांग्त्से बॉर्डर जवळ घडली. चिनी सैनिकांनी तवांग सेक्टरमध्ये घुसखोरी करून भारतीय सीमेवर बांधलेल्या रिकाम्या बंकरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक चिनी सैनिक भारतीय सीमेच्या आत घुसले होते, मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना हाकलून लावत चिनी सैनिकांची योजना उधळून लावली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांनाही तात्पुरते पकडले होते. स्थानिक लष्करी कमांडर पातळीवरील चर्चेनंतर आणि प्रकरण मिटल्यानंतर चिनी सैनिकांना सोडून देण्यात आले. भारतीय लष्कराचे कोणतेही नुकसान झाले नाही. लष्कर या प्रकरणाला महत्त्व देण्याच्या मनस्थितीत नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (People’s Liberation Army) च्या सुमारे 100 सैनिकांनी 30 ऑगस्ट रोजी उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेा (LAC) ओलांडली होती. या घटनेची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की चिनी सैनिक काही तास घालवल्यानंतर त्या भागातून परतले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी काल सांगितले की, भारताने हे स्पष्ट केले आहे की चीनच्या एकतर्फी आणि प्रक्षोभक वर्तनामुळे पूर्व लडाखमधील एलएसीच्या बाजूने शांतता भंग झाली आहे. भारताने आशा व्यक्त केली आहे की, द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन करून पूर्व लडाखमधील एलएसीसह (LAC) उर्वरित समस्यांचे लवकर निराकरण करण्यासाठी चीन काम करेल.
गेल्या वर्षी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये (Ladakh) भारत आणि चीन ( india china ) यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर सीमावाद सुरु झाला होता. यानंतर, दोन्ही बाजूंनी सीमेवर सैन्य आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे तैनात करण्यात आली. यानंतर दोन्ही देशांमधील लष्करी व मुत्सद्दी पातळीवर अनेक चर्चाही झाल्या. यानंतर भारत आणि चीनचे सैन्य काही ठिकाणाहून मागे हटले आहे.