U19 T20 WC: भारताने जिंकला टी-20 वर्ल्डकप; इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव

WhatsApp Group

INDW vs ENGW, U19 T20 WC: भारत आणि इंग्लंड यांच्यात अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार शफाली वर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ अवघ्या 68 धावांवर गारद झाला. जगज्जेते होण्यासाठी भारताला फक्त 69 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. भारताने हे लक्ष्य 14 षटकांत पूर्ण केले आणि विजेतेपदावर नाव कोरले आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या नावावर असलेला हा पहिलाच विश्वचषक आहे.

अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 17.1 षटकात 68 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी अवघ्या 69 धावांचे लक्ष्य मिळाले होते. अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा आणि तीतस साधू यांनी 2-2 विकेट घेतल्या आहेत. मन्नत कश्यप आणि शेफाली वर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इंग्लंडकडून रायना मॅकडोनाल्ड-गेने सर्वाधिक 19 आणि अॅलेक्स स्टोनहाउसने 11 धावा केल्या.

69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सलामीवीर बॅटर आणि कर्णधार शेफालीने दमदार सुरुवात केली. पण ती 11 चेंडूत 15 धावा करून बाद झाली. भारताला पहिला धक्का 16 धावांवर बसला. यानंतर स्पर्धेतील टॉप स्कोअरर श्वेता शेरावतही 5 धावा करून बाद झाली आणि भारताला 20 च्या स्कोअरवर आणखी एक धक्का बसला. त्यानंतर सौम्या तिवारी आणि त्रिशा यांनी डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली आणि भारताला सहज विजय मिळवून दिला. भारताने हा सामना 7 विकेटने जिंकला. भारतीय संघाने 14 षटकांत लक्ष्य गाठून विश्वचषक जिंकला.

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण स्पर्धेत संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या संघाने गटातही अव्वल स्थान पटकावले. यानंतर टीम इंडिया सुपर सिक्समध्येही अव्वल स्थानावर होती. संपूर्ण स्पर्धेत भारताने 7 पैकी 6 सामने जिंकले. या स्पर्धेत शफाली वर्माच्या यंग ब्रिगेडचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एकच सामना हरला होता. आता हा संघ इतिहासाच्या पानात अजरामर झाला आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही टप्प्यावर भारतासाठी हा पहिलाच विश्वचषक आहे. शेफालीच्या या तरुण संघाने जे वरिष्ठ संघ करू शकले नाही ते करून दाखवले.