Asian Champions Trophy 2023: भारताने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले, मलेशियाचा 4-3 ने केला पराभव

0
WhatsApp Group

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने मलेशियाचा 4-3 असा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचे विजेतेपद पटकावले आहे. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेवटच्या दोन क्वार्टरमध्ये धमाका दाखवला. टीम इंडियाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या पराभवामुळे मलेशियाचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. भारतीय हॉकी संघाने 2011, 2016, 2018 आणि 2023 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

भारतीय हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. आठव्या मिनिटालाच टीम इंडियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावर युगराज सिंगने शानदार गोल करत टीम इंडियाला 1-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, 14व्या मिनिटालाच मलेशियाच्या संघाने अझराई अबू कमालच्या जोरावर गोल करत स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने गोल करण्याच्या अनेक महत्त्वपूर्ण संधी गमावल्या. दुसरीकडे, दुसऱ्या क्वार्टरमध्ये मलेशियाच्या संघाने सातत्याने गोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही मिळाले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 18व्या मिनिटाला राहीझ राजीने आणि 28व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर मोहम्मद अमिनुद्दीनने गोल करत मलेशियाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. टीम इंडियाच्या खेळाडूंना दुसऱ्या क्वार्टरमध्ये चांगला खेळ दाखवता आला नाही. या क्वार्टरमध्ये बहुतांश चेंडू मलेशियाच्या खेळाडूंकडेच राहिले.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी शानदार पुनरागमन करत सर्वोत्तम नियोजन करून गोल करण्याचा प्रयत्न केला. या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी एकहाती कामगिरी केली. याचा फायदा त्यांना शेवटच्या क्षणी झाला जेव्हा हरमनप्रीत सिंगने गोल करून 3-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याच मिनिटाला गुरजंत सिंगने काउंटर अ‍ॅटॅक करताना उत्कृष्ट गोल करत गुणसंख्या 3-3 अशी बरोबरीत आणली. या गोलने टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. भारतीय संघासाठी चौथ्या क्वार्टरमध्ये आकाशदीप सिंगने गोल करत भारतीय संघाला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि टीम इंडियाने विजेतेपद पटकावले.