Asia Cup 2022: जय हो… भारताचा पाकिस्तानवर 5 गडी राखून विजय

WhatsApp Group

IND vs PAK:  भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक 2022 चा पहिला सामना पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून जिंकला आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जिथे बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ निर्धारित 20 षटके न खेळता 147 धावांवर गडगडला. त्यामुळे 148 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने 5 विकेट्स राखत सहज गाठले. या विजयासह भारताने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या 10 विकेट्सनी झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे.

पाकिस्तानकडून मिळालेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी एका धावेवर सलामीवीर केएल राहुलची (0) विकेट गमावली. यानंतर कर्णधार रोहित शर्मा (12) आणि विराट कोहली (35) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 46 चेंडूत 49 धावांची भागीदारी केली. पण मोहम्मद नवाजने प्रथम कर्णधार रोहित आणि नंतर विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यामुळे दोन्ही फलंदाजांची अर्धशतकी भागीदारी पूर्ण होऊ शकली नाही. विराटने 34 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या.

10व्या षटकात 53 धावांत तीन विकेट्स गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव (18) आणि रवींद्र जडेजा (35) यांनी फलंदाजी करताना चौथ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. नसीमने सूर्यकुमारला बाद करताना ही दीर्घ भागीदारी पुन्हा एकदा मोडली. भारताला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या 5 षटकात 51 धावांची गरज होती आणि जडेजासह हार्दिक पांड्या मैदानावर होता. जडेजा आणि पांड्याने पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी करून भारताला विजयापर्यंत नेले. शेवटच्या षटकात भारताला 7 धावांची गरज होती आणि चेंडू मोहम्मद नवाजच्या हातात होता. मात्र हार्दिकने षटकार ठोकत विजय मिळवून दिला. जडेजाने 29 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. हार्दिकने 17 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 33 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.