‘सार्वभौम क्रिकेट राजा ‘भारत’! ‘विराट’सेनेचा दक्षिण आफ्रिकेवर ‘सेंच्युरियन’ विजय
गॅब्बा का घमंड।
ब्रिस्बेन का भौकाल।
लॉर्ड्स पर ललकार।
ओव्हल की ऊंचाई।
और सेंच्युरियन कि शहनाई।।
भारतीय क्रिकेट संघाने सरत्या वर्षात अनेक संस्मरणीय कसोटी शीलालेख क्रिकेटच्या अनेक महान तीर्थक्षेत्री लिहिले! गेल्या दोनेक वर्षांत हा संघ असे अनेक शिलालेख लिहीत आणि भक्कमपणे स्थापित करत चाललाय. अनेक अविस्मरणीय विजय, कसोटी मध्ये निर्विवाद वर्चस्वासह हे शिलालेख भारतीय संघाच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. त्या पराक्रमांची महती गाणारे, भारतीय क्रिकेटच्या अद्वितीय शौर्याचे वर्णन करणारे आणि खाली सणसणीत मोहोर असणारे…. “सार्वभौम क्रिकेट राजा, भारत”!
आज त्यामध्ये सेंच्युरियन क्षेत्र समाविष्ट झाले. सेंच्युरियन पडले. सुपरस्पोर्ट्स पार्क सेंच्युरियन. अनेक लढाया पाहिलेले क्रिकेट क्षेत्र! इथे भले भले संघ येऊन नेस्तनाबूत झाले! जणू आफ्रिकनांचे गॅब्बाच! अपराजित क्रिकेट राजधानी! आज ती सर झाली… तोफा उडाल्या, साखर वाटली गेली, वर्दी गेली, विशेष स्वाऱ्या लगबगीने आल्या… आनंदोत्सव झाला मोठा…! भारताच्या कसोटी संघाने द. आफ्रिकेला सेंच्युरियन कसोटीत हरवले.
कोणत्याही आदर्श कसोटी विजयाप्रमाणे या विजयात देखील सांघिक योगदान ठळक होते. म्हणजे कोणा एका खेळाडूंच्या “हिरोइक्स” मुळे हा विजय आपण प्राप्त केला असे म्हणू शकणार नाही. हा संघीक प्रयत्न होता. अर्थात प्रत्येकाने उत्तम कामगिरी केली आणि काहींनी त्यातही उठून दिसावी अशी कामगिरी केल्यामुळेच हे शक्य झाले हेही खरे.
के एल राहुल नामक सलामीवीराची तपःश्चर्या फळाला आली. या कसोटीतील तो एकमेव शतकवीर. त्यातही हे शतक सर्वार्थाने विशेष. कारण आफ्रिकेत झळकावलेले हे केवळ दुसरे भारतीय शतक. १२२ धावांची खेळी करताना के एल ने भारतीय संघाच्या विजयाची पायाभरणी केली. ते करताना त्याने तब्बल ३३४ चेंडू खेळले. समोरच्या संघाला ठराविक लक्ष्य दिले म्हणजे झाले असे नाही त्या संघाला बाद करणे आणि कसोटीत २ वेळा प्रतिस्पर्ध्याला बाद करणे महत्वाचे असते. ते काम भारतीय गोलंदाजांनी चोखपणे पार पडले.
एरवी भारतीय गोलंदाजी, त्यातही वेगवान गोलंदाजी ही पूर्वापार दाहक वगैरे मानली जात नव्हती. गेल्या दोनेक वर्षात त्या मान्यतेला आपल्या संघाने तडा दिला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन यांनी आफ्रिकन फलंदाजांना क्षणाचीही उसंत न मिळवू देता “तंबूचा रस्ता तिकडे आहे” वगैरे अंगुलीनिर्देश केला! पहिल्या डावात शमीने ५ तर दुसऱ्या डावात ३ आणि बुमराह ने २ आणि ३ बळी घेत आपले काम पार पाडले. समोरच्या संघाचे २० बळी घेणारा संघ कसोटीत विजयी होतो हे समीकरण सिद्ध केले.
कर्णधार कोहली याच्या नावावर जमा झालेला अजून एक कसोटी विजय एवढेच याचे त्याच्या लेखी महत्व नसावे! सध्या फलंदाजीत चाचपडत असलेल्या कोहलीच्या दृष्टीने कर्णधारपदाच्या रकान्यात विजय ही जमेची बाजू. बाकी काहीही असले तरी कसोटीत आपला म्हणून एक संघ बांधण्यात आणि तो संघ एकसंध ठेवण्यात कोहली यशस्वी झालाय. हे एका प्रभावशाली कर्णधाराचे लक्षण आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये सर्वाधिक कसोटी (७ विजय) जिंकणारा तो आशियाई कर्णधार ठरला. यामुळे एक कर्णधार म्हणूनच नाही तर एक पूर्ण भौगोलिक विभागाचा तो आता प्रतिनिधी झालाय!
बॉक्सिंग डे कसोटीत सलग तिसऱ्या वर्षी विजय मिळवणारा देखील तो पहिला भारतीय कर्णधार. बघता बघता कर्णधार म्हणून त्याचे ४० कसोटी विजय पूर्ण झाले. केवळ ग्रीम स्मिथ ५३, पॉंटिंग ४८ आणि स्टीव्ह वॉ ४१ त्याच्या पुढे आहेत. सर्वार्थाने महान कर्णधार असणारी ही “Elite List” ! त्यामुळे कोहली एक महान कसोटी कर्णधार आहे हे सिद्ध होत आहे. तो केवळ अधिक आक्रमक आहे म्हणून त्याच्या या गुणाकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना? यावर काही भारतीय क्रिकेटप्रेमींनी विचार केला पाहिजे. अन्य कर्णधारांप्रमाणे त्याची बॅट जर तळपती असती तर त्याला श्रेय देताना अनेकांनी घेतलेला आखडता हात तसा दिसला नसता.
२०२१ मध्ये अहंकाराचे अनेक बुरुज उध्वस्त करण्याचे काम भारतीय संघाने केले. गॅब्बा, ब्रिस्बेन, ओव्हल, सेंच्युरियन वगैरे प्रतिस्पर्धी गड त्याची उदाहरणे. एकेकाळी अजेय असलेले, त्यातही टुरिंग भारतीय संघासाठी विशेष, समोरच्या संघाला खिजवणारे, बलाढ्य संघाचे गंडस्थळ असलेले गड! आज अजून एक गड सर झाला… क्रिकेट नामक भूमीला नम्र सलाम करत पादाक्रांत करण्यासाठी!
अधिक बातम्या वाचा
हरभजन सिंग – वादळी कारकीर्द, औपचारिक शेवट…
ऑस्ट्रेलियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची ३-० ने विजयी आघाडी