भारतीय क्रिकेट संघातून बऱ्याच दिवसांपासून बाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये साहाने नुकताच झालेला रणजी करंडक हा त्याचा शेवटचा हंगाम असल्याचे जाहीर केले. डिसेंबर 2021 मध्ये त्याने मुंबईत शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
गेल्या महिन्यात 40 वर्षांचा झालेला साहा भारतासाठी 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळला आहे. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर, साहा बराच काळ भारताचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत साहा दुसऱ्या स्थानावर आहे. धोनी आणि पंत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या साहाने आपल्या कारकिर्दीत 1353 कसोटी धावा केल्या आणि तीन शतके झळकावली.
साहाने तीन वर्षांपूर्वी डिसेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याने पहिल्या डावात 27 तर दुसऱ्या डावात 13 धावा केल्या. तत्कालीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आणि ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून केएस भरतची निवड केली.