India Vs Sri Lanka, 1st T20: रोमहर्षक सामन्यात भारत 2 धावांनी विजयी

WhatsApp Group

India Vs Sri Lanka, 1st T20: शिवम मावीची घातक गोलंदाजी आणि दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने मुंबईतील वानखेडेवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम खेळताना भारतीय संघाने 20 षटकात 5 बाद 162 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ निर्धारित षटकांत केवळ 160 धावाच करू शकला. श्रीलंकेसाठी कर्णधार दासुन शांकाने 27 चेंडूत 45 धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याच्याशिवाय कुसल मेंडिसने 28, चमिका करुणारत्नेने नाबाद 23 आणि वनिंदू हसरंगाने 21 धावा केल्या. मावीशिवाय उमरान मलिक आणि हर्षल पटेल या दोन वेगवान गोलंदाजांनाही दोन यश मिळाले.

चमिका करुणारत्नेने सामना जवळपास श्रीलंकेच्या खिशात घातला होता, मात्र अक्षर पटेलने शेवटच्या षटकात समंजस गोलंदाजी करत शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाला विजय मिळवून दिला. करुणारत्नेने 16 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या, मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 13 धावांची गरज होती.

भारताकडून मिळालेल्या 163 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर पथुम निसांका 1, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला धनंजय डी सिल्वा 8 धावा करून बाद झाला. यानंतर चरित असलंकाही केवळ 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर सलामीवीर कुसल मेंडिसही 25 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने पाच चौकार मारले. 51 धावांत चार विकेट पडल्यानंतर श्रीलंकेच्या चाहत्यांना भानुका राजपक्षे याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण तोही भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकला नाही आणि केवळ 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार दासुन शनाकाने मोठे फटके मारले. त्याने आणि वानिंदू हसरंगाने श्रीलंकेच्या संघाला सामन्यात पुनरागमन केले होते, मात्र उमरान मलिकने शनाकाला बाद करून सामना परत भारताच्या हातात दिला. हसरंगाने 10 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांसह 21 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार शनाकाने 27 चेंडूत 45 धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले.