कानपूर कसोटी ड्रॉ, टीम इंडियाकडून ‘या’ भारतीयांनी हिरावून घेतली विजयाची संधी

WhatsApp Group

कानपूर – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामना ड्रॉ करण्यात न्यूझीलंडला यश आले आहे. या सामन्यात किवी संघाने संघाने शेवटच्या दिवशी झुंजार फलंदाजी करत हा सामना अनिर्णित ठेवला. सामना अनिर्णित करण्यासाठी पदार्पण करणारा युवा खेळाडू रचिन रवींद्रने 91 चेंडू खेळले. त्याचवेळी एजाज पटेलनेही 23 चेंडूंचा सामना करत सामना अनिर्णित राखण्यात मोठी भूमिका बजावली. रचिन रवींद्रने  91 चेंडूचा सामना करताना 18 धावा केल्या तर एजाजने 23 चेंडूंमध्ये 2 धावा केल्या. हा थरारक सामना अनिर्णित राखण्यास या दोघांचा वाटा मोठा होता.

284 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने पाचव्या दिवसअखेर 9 बाद 165 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी दुसऱ्या डावात टॉम लॅथमने 146 चेंडूमध्ये सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ चौथ्या दिवशी नाईट वॉचमन म्हणून आलेल्या विल सोमरविलेने 110 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी केली. तर केन विल्यमसनला २४ धावा केल्या. या सर्वांनी केलेल्या झुंजार खेळीमुळे हा सामना ड्रॉ झाला.

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून फिरकीपटू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4, रवीचंद्रन अश्विनने 3 तर अक्षर पटेल आणि उमेश यादवने प्रत्येकी 1 विकेट्स घेतला. या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साऊदीने सर्वाधिक 8 विकेट्स घेतले, त्याने भारताच्या पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 3 विकेट्स आपल्या नावावर केले.

श्रेयस अय्यर ठरला सामनावीर पुरस्काराचा मानकरी

कानपूर कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करणारा पदार्पणवीर श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. श्रेयसने पहिल्या डावात भारतासाठी शानदार 171 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी तर दुसऱ्या डावात 125 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

धावफलक

भारत – 345 आणि 234/7 (डाव घोषीत)
न्यूझीलंड – 296 आणि 165/9