India Vs Bangladesh : जडेजा-अश्विन जोडीनं केला चमत्कार, धोनी-लक्ष्मण सारख्या दिग्गजांना टाकलं मागे, पहिल्याच कसोटीत केला ‘हा’ विक्रम
Ravi Ashwin & Ravindra Jadeja : रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या जोरावर टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चांगल्या धावा केल्या. बांगलादेशने पहिले दोन सत्र पूर्णपणे जिंकले होते, मात्र बांगलादेशच्या सर्व गोलंदाजांनी जडेजा-अश्विनसमोर शरणागती पत्करली. दोघांमध्ये 195 धावांची भागीदारी झाली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताची सुरुवात खूपच खराब झाली. येथे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे फलंदाजही विशेष काही करू शकले नाहीत. पण नंतर जडेजा-अश्विन जोडीने डावाची धुरा सांभाळली. या काळात दोन्ही फलंदाजांनी काही खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
जडेजा-अश्विनने धोनी-लक्ष्मणला मागे टाकलं आहे. घरच्या मैदानावर कसोटीत सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील फलंदाजी करताना भारतासाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम कपिल देव आणि सय्यद किरमानी यांच्या नावावर आहे. या दोन फलंदाजांनी 14 सामन्यात 617 धावा जोडल्या आहेत. आता या यादीत अश्विन-जडेजा जोडी दुसऱ्या स्थानावर आली आहे, जिथे दोघांनी 14 सामन्यात 500 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. या यादीत महेंद्र धोनी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ही जोडी तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यांनी तीन सामन्यांमध्ये 486 धावांची भागीदारी केली आहे.
जडेजा-अश्विनने जोडीने केली कमाल
गुरुवारी अश्विन आणि जडेजा यांच्यातील भागीदारी ही भारताने बांगलादेशविरुद्ध 7व्या विकेटसाठी किंवा त्यापेक्षा कमी विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी, भारतासाठी सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करुण नायर आणि रवींद्र जडेजा यांनी 2016 मध्ये केली होती, जेव्हा दोन्ही फलंदाजांनी 138 धावा जोडल्या होत्या. याशिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये 7व्या विकेटसाठी भारताची ही 8वी सर्वोच्च भागीदारी आहे.
अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावं शतक ठोकलं
एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या कसोटीत अश्विनने कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. त्याने अवघ्या 108 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा केल्या. या खेळीदरम्यान, अश्विनने एक अतिशय खास विक्रम आपल्या नावावर केला, जिथे तो कसोटीत 20 वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आणि 500 हून अधिक बळीही घेतले.