India vs Australia: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका घातली खिशात, चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना 20 धावांनी जिंकून भारताने मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

WhatsApp Group

India vs Australia: रायपूरच्या मैदानावर झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 20 धावांनी विजय मिळवत मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 174 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने अतिशय वेगवान सुरुवात करत अवघ्या 3 षटकांत 40 धावा केल्या. मात्र, भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देत सामन्यात पुनरागमन केले आणि त्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स घेणे सुरूच ठेवले. ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 गडी गमावून 154 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि 20 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाची सुरुवात ट्रॅव्हिस हेड आणि जोश फिलिप यांनी केली, या दोघांनी मिळून पहिल्या 3 षटकात 40 धावा जोडल्या. यानंतर डावातील चौथे षटक टाकण्यासाठी भारताकडून आलेला लेगस्पिनर रवी बिश्नोई याने पहिल्याच चेंडूवर जोश फिलिपला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर ऑस्ट्रेलियाला लवकरच दुसरा धक्का 44 धावांवर ट्रेव्हिस हेडच्या रूपाने बसला, जो अक्षर पटेलचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या 6 षटकात 2 गडी गमावून 52 धावांपर्यंतच मजल मारता आली.

 

भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पुनरागमनाची संधी दिली नाही

या सामन्यात ऑस्ट्रेलियाला तिसरा मोठा धक्का 52 धावांवर अॅरॉन हार्डीच्या रूपाने बसला, ज्याने केवळ 8 धावा केल्यानंतर अक्षर पटेलकडे विकेट सोपवली. यानंतर बेन मॅकडर्मेट आणि टीम डेव्हिडने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या 87 धावांपर्यंत नेली. अक्षर पटेलने मॅकडर्मेटच्या गोलंदाजीवर ही धोकादायक भागीदारी मोडली. इथून ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करणे फार कठीण झाले. 105 धावांवर टीम डेव्हिडनेही 19 धावा करून दीपक चहरला आपली विकेट दिली. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड डावाच्या अखेरपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 36 धावांची खेळी खेळली मात्र त्याला संघाला विजयापर्यंत नेण्यात यश आले नाही. भारताकडून या सामन्यात अक्षर पटेलने 3, दीपक चहरने 2 तर रवी बिश्नोई आणि आवेश खानने प्रत्येकी 1 बळी घेतला.

रिंकू आणि जितेशने बॅटने कमाल दाखवली

या सामन्यातील भारतीय संघाच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रुतुराज गायकवाड यांच्यात 50 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. जैस्वालने 37 धावांची खेळी केली, तर गायकवाडने 32  धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने 63 धावांपर्यंत 3 विकेट गमावल्या. इथून रिंकू सिंगने एका टोकाकडून डाव सांभाळताना धावा करत राहिल्या, ज्यात त्याला नंतर जितेश शर्माचीही साथ मिळाली. रिंकूने 29 चेंडूत 46 धावांची खेळी केली, तर जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावा केल्या, ज्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात 20 षटकात 174 धावांपर्यंत मजल मारता आली. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील शेवटचा सामना 3 डिसेंबरला बेंगळुरूच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.