नवीन वर्षातील पहिल्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. शनिवारी, ३ जानेवारी रोजी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयची (BCCI) निवड समिती न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. ही मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार असून, आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या एकदिवसीय मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंच्या भविष्याचा फैसला होण्याची शक्यता आहे.
इशान किशनची घर वापसी आणि पंतचे काय?
या निवडीमध्ये सर्वात जास्त चर्चा यष्टीरक्षक फलंदाजांची आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघात असूनही एकही सामना न खेळायला मिळालेल्या ऋषभ पंतला या मालिकेतून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विजय हजारे ट्रॉफीमध्ये अवघ्या ३४ चेंडूत शतक ठोकून खळबळ माजवणारा इशान किशन संघात पुनरागमन करण्यास सज्ज आहे. इशानने टी-२० फॉरमॅटमध्ये आपली जागा पक्की केल्यानंतर आता वनडेमध्येही तो केएल राहुलचा बॅकअप म्हणून प्रबळ दावेदार मानला जात आहे. ध्रुव जुरेलचे नावही चर्चेत असले तरी अनुभवी इशानला पसंती मिळण्याची चिन्हे अधिक आहेत.
मोहम्मद शमी आणि निवड समितीतील ‘कोल्ड वॉर’
सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर शमी भारतीय जर्सीमध्ये दिसलेला नाही. फिटनेस आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्याशी असलेल्या कथित मतभेदांच्या चर्चांमुळे शमीचे भविष्य टांगणीला लागले आहे. मात्र, घरगुती क्रिकेटमध्ये शमीने सातत्याने बळी घेत आपण अजूनही ‘मॅच विनर’ असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्यासोबतच मोहम्मद सिराजलाही संघात पुन्हा स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. सिराजला गेल्या काही मालिकांपासून विश्रांती देण्यात आली होती, त्यामुळे त्याचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे.
टी-२० स्टार्सना विश्रांती, गिलकडे नेतृत्व?
टी-२० विश्वचषकाचे नियोजन लक्षात घेता अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि अक्षर पटेल यांसारख्या खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. याउलट, कर्णधार शुभमन गिल या मालिकेतून मैदानावर परतणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळणार असले तरी, तरुण रक्ताला संधी देण्यावर निवडकर्त्यांचा भर असेल. प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा असेल, तर श्रेयस अय्यरच्या निवडीबाबत त्याच्या फिटनेस अहवालाची प्रतीक्षा आहे.
