ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा; मोहम्मद सिराजसह ‘या’ खेळाडूंना संघातून डावललं
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघानं 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केलीय. चॅम्पियन्स ट्रॉफी येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरु होईल. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान खेळवली जाईल. ही स्पर्धा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) संयुक्तपणे आयोजित करतील.
शुभमन गील उपकर्णधार : दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीच्या बैठकीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली. रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तर शुभमन गीलला उपकर्णधार बनवण्यात आलंय.
मोहम्मद शमीला संधी : मोहम्मद शमी 14 महिन्यांनंतर भारतीय वनडे संघात परतला आहे. शमीनं नोव्हेंबर 2023 मध्ये वनडे विश्वचषकात टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. शमीप्रमाणेच बुमराह देखील 14 महिन्यांनी वनडे संघात परतला आहे. मात्र, वेगवान मोहम्मद सिराजचा संघात स्थान देण्यात आलं नाही. त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली आहे.
अष्टपैलू खेळाडू : वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पंड्या यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं आहे. कुलदीप यादवही संघात आहे. यशस्वी जयस्वालचा प्रथमच वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.
मोहम्मद सिराज बाहेर : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं मोहम्मद सिराजला संघात न निवडण्यामागील कारण सांगितलं आहे. “मोहम्मद सिराज तेवढा प्रभावी ठरत नव्हता आणि खेळ जसजसा पुढं सरकतो आणि चेंडू थोडा जुना होत जातो तसतशी त्याची प्रभावीता कमी होत जाते. म्हणूनच वेगवान गोलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.” असं रोहित म्हणाला. केएल राहुल हा विकेटकीपर म्हणून पहिली पसंती होता. त्यानुसार केएलची निवड करण्यात आली आहे. तर ऋषभ पंतने पर्यायी विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनवर मात करत संघात स्थान मिळवलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप. यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गट
गट अ – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
गट ब – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई