Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामना राहिला अपूर्ण, ‘रिझर्व्ह डे’ला कसा खेळवला जाणार सामना, जाणून घ्या सर्व

WhatsApp Group

आशिया चषक (Asia Cup 2023) सुपर-4 मधील भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर-4 सामन्यात पावसामुळे अखेर पंचांनी आजचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही संघांमधील हा सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. पावसामुळे सामना थांबला तोपर्यंत भारतीय संघाने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. आता राखीव दिवशी येथून खेळाला सुरुवात होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पावसाची शक्यता लक्षात घेऊन आशियाई क्रिकेट परिषदेने राखीव दिवस ठेवला होता. सामन्यादरम्यान पाऊस सुरू झाला तेव्हा संपूर्ण मैदान कव्हरने झाकले गेले. अशा स्थितीत ग्राऊंड स्टाफ त्या जागा दुरुस्त करण्याचा सतत प्रयत्न करत होता. त्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पंचांनी आजचा खेळ रद्द करून सामना राखीव दिवशी हलविण्याचा निर्णय घेतला. आता हा सामना 11 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.

उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पूर्ण 50 षटकांचा खेळवला जाणार आहे. उद्या भारत 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात करेल. राखीव दिवशीही सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही, तर तो रद्द केला जाईल आणि दोन्ही संघांना प्रत्येकी अर्धे गुण मिळतील. आशिया कप 2023 च्या सुपर 4 च्या इतर सामन्यांना राखीव दिवस देण्यात आलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

या सामन्याबद्दल बोलताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 58 धावा करून बाद झाला तर रोहित शर्मा 56 धावा करून बाद झाला. विराट कोहली 8 धावांवर आणि केएल राहुल 17 धावांवर नाबाद आहे.