Women’s Hockey World Cup 2022: भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषकातून बाहेर, स्पेनने 1-0ने मिळवला विजय

WhatsApp Group

Women’s Hockey World Cup 2022: स्पेनमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी विश्वचषक 2022 मधील भारतीय संघाचा प्रवास सोमवारी संपला. येथील एका महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला यजमान स्पेनकडून रोमहर्षक पराभव पत्करावा लागला. स्पेनने पूर्णवेळच्या अवघ्या 3 मिनिटे आधी गोल करून भारताच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या. याआधी, भारतीय संघ पूल-बीमधील तिन्ही सामन्यांत एकही विजय नोंदवू शकला नाही. भारतीय संघाचे दोन सामने अनिर्णित राहिले, उर्वरित एका सामन्यात त्यांचा पराभव झाला.

स्पेनविरुद्धच्या क्रॉस ओव्हर सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीला दमदार खेळ दाखवला. तीन क्वार्टरपर्यंत दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा होती. पण चौथ्या क्वार्टरमध्ये स्पेन आक्रमक झाला. सामन्यात 3 मिनिटे खेळ बाकी असताना भारतीय बचावफळीचा चक्काचूर झाला आणि स्पेनने गोल केला. हा गोल निर्णायक ठरला आणि भारताचा 1-0 असा पराभव झाला.

हा विश्वचषक भारतासाठी अत्यंत वाईट ठरला. चारपैकी एकाही सामन्यात संघाला विजय मिळवता आला नाही. पूली बी सामन्यात इंग्लंड आणि चीनने भारतासोबत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसरीकडे न्यूझीलंडने भारतीय संघाचा 4-3 आणि स्पेनने 1-0 असा पराभव केला.

भारतीय संघ आता विश्वचषकात 9व्या ते 16व्या स्थानासाठी इतर संघांशी भिडणार आहे. सोमवारी भारताचा सामना कॅनडाशी होणार आहे. तीनही सामने गमावून कॅनडा पूल-सीमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.