वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, विराटला संघात स्थान नाही

WhatsApp Group

या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कॅरेबियन दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची निवड केली आहे. यावेळी संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माच करणार असून विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गज मात्र संघात नसणार आहेत.

तसंच केएल राहुल आणि कुलदीप यादव यांचं संघात पुनरागमन झालं आहे मात्र त्यांच्या फिटनेसवर ते अंतिम 11 मध्ये असणार की नाही हे ठरणार आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन याला देखील संधी देण्यात आली आहे.

या दौऱ्यासाठी विराट कोहलीला संघात स्थान मिळालेले नाही. त्याची दुखापत पाहता त्याला विश्रांती देण्यात आली आहे, त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराहलाही विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून विश्रांती देण्यात आली आहे, कारण टीम इंडियाला ऑगस्टच्या शेवटी आशिया कप खेळायचा आहे.

भारताचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्याकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

T20 मालिकेचं वेळापत्रक

सामना तारिख ठिकाण
पहिला सामना 29 जुलै पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा सामना 1 ऑगस्ट सेंट किट्स आणि नेव्हिस
तिसरा सामना 2 ऑगस्ट सेंट किट्स आणि नेव्हिस
चौथा सामना 6 ऑगस्ट फ्लोरिडा, अमेरिका
पाचवा सामना 7 ऑगस्ट फ्लोरिडा, अमेरिका