भारतीय रेल्वेचे नवे पर्व! देशातील पहिली ‘हायड्रोजन ट्रेन’ धावण्यासाठी सज्ज; जींद-सोनीपत दरम्यान होणार ऐतिहासिक चाचणी
जींद (हरियाणा): तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या क्षेत्रात भारत २०२६ या नवीन वर्षात एक मोठी क्रांती घडवण्यास सज्ज झाला आहे. देशात पहिल्यांदाच हायड्रोजन गॅसवर चालणारी रेल्वे (Hydrogen Train) रुळावर धावणार असून, हरियाणातील जींद जिल्हा या ऐतिहासिक कामगिरीचा साक्षीदार ठरणार आहे. जींद ते सोनीपत या मार्गावर ही पर्यावरणपूरक ट्रेन चालवली जाणार असून, याच आठवड्यात या रेल्वेची अंतिम ‘लोड चेक’ चाचणी पार पडणार आहे. या चाचणीनंतर पंतप्रधान कार्यालयाची अंतिम मंजुरी मिळताच या रेल्वेचे नियमित संचलन सुरू होईल.
पाण्याचे इंधनात रूपांतर आणि वेगवान प्रवास
हायड्रोजन ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ किलोग्रॅम पाण्यापासून ९०० ग्रॅम हायड्रोजन इंधन तयार केले जाईल, ज्यावर ही ट्रेन १ किलोमीटरचे अंतर कापू शकेल. प्रदूषणाचे प्रमाण शून्य असलेल्या या ट्रेनचा ताशी वेग १५० किलोमीटर इतका असणार आहे. यामुळे केवळ इंधनाची बचत होणार नाही, तर प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. ही रेल्वे ‘ग्रीन टेक्नॉलॉजी’च्या क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देईल.
जींदमध्ये देशातील सर्वात मोठा हायड्रोजन प्लांट
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जींद रेल्वे स्थानकावर स्पेनमधील एका नामवंत कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक हायड्रोजन गॅस उत्पादन प्लांट उभारण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा हायड्रोजन प्लांट असून, त्याला पंतप्रधान कार्यालयाने यापूर्वीच हिरवा कंदील दिला आहे. या ट्रेनचे डबे चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आले असून, सध्या ते दिल्लीतील शकूर बस्ती स्थानकावर पोहोचले आहेत. २६ जानेवारीपासून जींद-सोनीपत दरम्यान ९० किलोमीटरच्या टप्प्यात या ट्रेनची ट्रायल रन घेतली जाणार आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि मेट्रोसारखा अनुभव
हायड्रोजन ट्रेन केवळ इंधनाच्या बाबतीतच नाही, तर सोयीसुविधांच्या बाबतीतही प्रगत आहे. या ट्रेनमध्ये मेट्रोप्रमाणेच डिजिटल डिस्प्ले सिस्टम आणि स्वयंचलित (Automatic) दरवाजे बसवण्यात आले आहेत. ट्रेनमधील वातानुकूलित यंत्रणा (AC), दिवे आणि पंखे हे सर्व हायड्रोजन ऊर्जेवर चालणार आहेत. रेल्वेने या प्लांटसाठी १.५ मेगावॅटची वीज जोडणी घेतली असून, ३,००० किलो हायड्रोजन साठवण्याची क्षमता असलेले मोठे टँक्सही उभारले आहेत. हरियाणाचे विधानसभा उपाध्यक्ष डॉ. कृष्ण मिड्ढा यांनी या प्रकल्पाचे वर्णन “जींद आणि देशासाठी अभिमानास्पद क्षण” असे केले आहे.
